आधी अनफॉलो आणि नंतर चक्क रोहितसोबतचा फोटो; शुभमन गिल हिटमॅनसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाचा सुपर-८ मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर-८ सुरू होण्यापूर्वी, शुभमन गिल आणि आवेश खान हे माघारी परतले असून रिंकू सिंग आणि खलील अहमद राखीव खेळाडू म्हणून संघासोबत उपस्थित आहेत.

शुभमन गिलला टीम सोबत वेस्ट इंडिजला पुढच्या स्पर्धेसाठी न थांबवता इतर खेळाडूंना स्थान दिल्यात आल्याने शुभमन आता कर्णधार रोहित शर्मावर रागवला असल्याचे बोलले जात आहे. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला की शुभमनला शिस्तभंगाच्या कारणांमुळे घरी पाठवण्यात आले आहे तर त्याचवेळी गिलने रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केले असल्याचे समोर आले.यामुळे रोहित आणि गिलमध्ये सर्व काही ठीक चालत नसल्याची चर्चा सुरू असताना आता अलीकडेच गिलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

शुभमन गिल हा भारताच्या १५ सदस्यीय संघाचा भाग होता तर या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या चार खेळाडूंमध्ये गिलचा समावेश होता. मात्र, संघ व्यवस्थापन आणि गिल यांच्यात काही ठीक चालत नसल्याच्या अफवा पसरलेल्या असताना या सर्व अफवा आता शुभमनने खोट्या ठरवल्या. अलीकडेच गिलने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमनचा एकत्र फोटो आहे तर दुसऱ्या फोटोत गिल, रोहित आणि समायरा (रोहितची मुलगी) दिसत आहेत. गिलने या फोटोवर समायरा आणि मी रोहितकडून शिस्त शिकत आहोत असे कॅप्शन लिहिले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि आवेश यांना सोडण्यामागील तर्क अगदी सोपा आहे की कर्णधार रोहित किंवा विराट कोहलीला दुखापतीची चिंता असल्यास, संघाकडे आधीपासूनच १५ सदस्यीय संघात यशस्वी जयस्वाल आहे, जो सलामीची खेळी खेळू शकतो. सुपर-८ दरम्यान चौथ्या सलामीवीराची गरज नाही. न्यूयॉर्कमधील सराव सत्रात गिलला फलंदाजीसाठी फारसा वेळ मिळाला नसल्याचेही दिसून आले

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-16T12:39:00Z dg43tfdfdgfd