एका चेंडूवर 4 धावांची गरज... अन् मग 19 वर्षीय फलंदाजाने आपल्या कामगिरीने केले थक्क, सगळे बघत बसले

Big Bash League​ 2026: बिग बॅश लीगच्या सध्याच्या हंगामात बुधवारी एक अत्यंत थरारक सामना पाहायला मिळाला. लीगमध्ये एक रोमांचक क्षण पाहायला मिळाला. अवघ्या 19 वर्षांच्या ऑलिव्हर पीक (Oliver Peake) याने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत मेलबर्न रेनेगेड्सला शानदार विजय मिळवून दिला. बिग बॅश लीगमधील 26 वा सामना पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात पर्थ येथे खेळवण्यात आला. सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूपर्यंत लांबला होता. विजयासाठी एका चेंडूवर 4 धावा आवश्यक असताना ऑलिव्हर पीकने दबाव झुगारत थेट षटकार खेचला आणि रेनेगेड्सला 4 विकेट्सनी सामना जिंकून दिला.

प्लेयर ऑफ द मॅच

या सामन्यातील दमदार कामगिरीमुळे ऑलिव्हर पीकला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. त्याने 30 चेंडूंमध्ये नाबाद 42 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला, तोही सामना जिंकवणाऱ्या अखेरच्या चेंडूवर.

ऑलिव्हर पीकचा शॉट पाहून सगळेच अचंबित

पर्थ स्कॉर्चर्सकडून शेवटचे षटक आरोन हार्डीने टाकले. एका चेंडूवर 4 धावा हव्या असताना बहुतेक फलंदाज तणावात जातात. मात्र ऑलिव्हर पीकने अगदी वेगळा विचार केला. त्याने वाईडच्या दिशेने सरकत फाईन लेगकडे शॉट खेळला. हा शॉट अत्यंत जोखमीचा होता, पण चेंडू आणि बॅटचा अचूक संपर्क साधला गेला. परिणामी चेंडू थेट सीमापार गेला आणि रेनेगेड्सने सामना आपल्या नावावर केला.

 

पर्थ स्कॉर्चर्स 127 धावांत गारद

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पर्थ स्कॉर्चर्सची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 49 धावांत संघाचे 3 गडी बाद झाले. आरोन हार्डीने सर्वाधिक 44 धावा केल्या, तर संघातील 5 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. मेलबर्न रेनेगेड्सकडून गुरिंदर संधूने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकांत 28 धावा देत प्रभावी मारा केला. हसन खानने 2, तर विल सदरलँड आणि जेसन बेहरेनडोर्फ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मेलबर्न रेनेगेड्सचा हा हंगामातील तिसरा विजय ठरला आहे. 6 गुणांसह संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पर्थ स्कॉर्चर्सला हंगामातील तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून 8 गुणांसह संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

2026-01-08T02:24:31Z