'एवढा खेळू नको' म्हणणाऱ्या ऋतुराजनेच चेन्नईला तारलं, गुजरातसोबत नाव ठेवणाऱ्यांची केली धुलाई

चेन्नई: आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. यामुळे चेन्नई सुपर किंग्जने १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चेन्नईच्या या विजयाचा हिरो ठरला ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाड गुजरात टायटन्सविरुद्ध चांगला खेळला तर चेन्नईचा संघ हरतो असे समीकरण जणू झाले होते. पण या सामन्यातही ऋतुराज शांत बसला नाही आणि थेट त्याने चौथे अर्धशतक झळकावले. आता चेन्नईच्या चाहत्यांना आणि संघाला २८ मे ची प्रतीक्षा आहे.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा गुजरातवरचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी ३ सामने खेळले गेले आणि तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या संघाने धोनीच्या चेन्नईचा पराभव केला. मात्र, आता चेन्नईने त्यांचा असा पराभव केला आहे की त्यांना जबरी धक्काच बसला. खरे तर चेन्नईने जे ३ सामने गमावले ते लीग सामने होते, पण हार्दिक पंड्याचा संघ प्लेऑफमध्ये हरला, हा मोठा धक्का होता. आता त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी दोनदा संघर्ष करावा लागणार आहे.

ऋतुराजचे चौथे अर्धशतक

विशेष म्हणजे या चारही सामन्यांमध्ये चेन्नईचा धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावले. एके काळी तो नर्व्हस नाईन्टीजचाही बळी ठरला होता, पण मागच्या ३ सामन्यात त्याला जे जमले नाही ते त्याने यावेळी केले. गुजरातविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर आणि फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऋतुराजने पुन्हा एकदा सीएसकेला दमदार सुरुवात करून दिली. त्याने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. त्याने ४४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या.

गुजरात टायटन्सविरुद्धचे हे त्याचे सलग चौथे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने ४८ चेंडूत ७३ धावा, ४९ चेंडूत ५३ धावा, ५० चेंडूत ९२ धावा आणि आता ४४ चेंडूत ६० धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी त्याला संघासाठी अशुभ म्हटले, मात्र यावेळी विजयाने तोच चेन्नईचा खरा हिरो असल्याचे सिद्ध केले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने ७ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ सर्व विकेट्स गमावून केवळ १५७ धावा करू शकला. त्याच्यासाठी शुभमन गिलने ३८ चेंडूत ४२ धावा केल्या, तर राशिद खानने १६ चेंडूत ३० धावा केल्या.

2023-05-24T05:33:36Z dg43tfdfdgfd