भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात कुलदीप यादववर (Kuldeep Yadav) इतका का संतापला होता यामागील कारण सांगितलं आहे. आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असं त्याने सांगितलं आहे. 37 वर्षीय रोहित शर्मा मैदानात योग्य क्षेत्ररक्षण न करणाऱ्या खेळाडूंवर नेहमीच संतापताना दिसतो. ऑस्ट्रेलियाविरोधातील सेमी-फायनल सामन्यात कुलदीप यादवने चेंडू पकडण्याचा प्रयत्न न केल्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा चांगलेच संतापले होते. त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
न्यूझीलंडविरोधातील अंतिम सामन्यातही कुलदीप यादवने स्टम्पमागे उभं राहून चेंडू पकडण्याचा प्रयत्न न केल्याने रवींद्र जडेजा आणि विराट कोहली संतापले होते. यामुळे ब्रेसवेलला रन आऊट करण्याची संधी हुकली होती.
चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने जिओ हॉटस्टारला मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपण मैदानात खेळाडूंवर का चिडतो यामागील कारण सांगितलं आहे. आपण खेळात वाहवत जातो, पण हे सर्व खेळाच्या उत्साहात घडते असं म्हटलं आहे.
"आमच्याकडे फार जबरदस्त संघ आहे. अशा कमिटेड खेळाडूंसोबत खेळण्याचा वेगळा आनंद असतो. प्रत्येकाला आपली भूमिका आणि जबाबदारी माहिती आहे. मैदानात असताना सर्व भावनात्मक असतात. कधीकधी मी त्यात वाहावत जातो. पण हे सर्व खेळासाठी असतं," असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
"मैदानात जे काही बोललं जातं ते उगाच दाखवण्यासाठी किंवा कोणाला दुखावण्यासाठी नसतात. ते फक्त पॅशनमुळे व्यक्त होणाऱ्या भावना असतात. दिवसाच्या अखेरीस जिंकणं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही हवं ते करण्यास तयार असतो," असं रोहित शर्माने सांगितलं.
न्यूझीलंडविरोधातील अंतिम सामन्यात कुलदीप यादव सामन्याचा स्टार होता. त्याने रचीन रविंद्र आणि केन विल्यम्सन यांची विकेट घेतली. दुसरीकडे रोहित शर्माने फलंदाजी करताना 252 धावांचा पाठलाग करत 76 धावा केल्या. ग्रुप स्टेज आणि सेमी-फायनल सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात असमर्थ ठरला होता. पण अंतिम सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.
भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीत अपराजित राहिला. रोहित शर्माने पाचपैकी एकही सामन्यात टॉस न जिंकल्याने ही कामगिरी महत्त्वाची ठरते. "पाचही टॉस गमावल्यानंतरही आम्ही अपराजित राहिलो. तरीही, आम्ही ट्रॉफी जिंकली. आम्ही खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये, आम्ही एकही गमावला नाही. एकही पराभव न होता स्पर्धा जिंकणे ही स्वतःच एक मोठी कामगिरी आहे आणि त्यामुळे मला खूप समाधान मिळाले," असं रोहित म्हणाला.
"खरं सांगायचं तर, आम्ही ट्रॉफी जिंकेपर्यंत कोणीही याबद्दल विचार केला नव्हता. पण विजयानंतर, त्याचा आम्हाला फटका बसलाय आम्ही संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलो होतो. त्या जाणीवेने ते आणखी खास बनवले. सध्या ते कसे वाटते ते शब्दात सांगणे कठीण आहे," असं तो पुढे म्हणाला.
2025-03-11T12:41:13Z