गुजरातचा १२ वा खेळाडू मुंबईवर पडणार भारी, QUALIFIER 2 मॅचपूर्वी रोहितची चिंता वाढली

अहमदाबाद : प्ले ऑफमध्ये कसं खेळायचं हे मुंबई इंडियन्सकडून शिकावं, असं म्हटलं जातं. मुंबईने एलिमिनेटरच्या सामन्यात लखनौला पराभूत केले आणि त्यांनी क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता मुंबईचा सामना हा गुजरातबरोबर होणार आहे. पण गुजरातचा १२ वा खेळाडू आता मुंबईवर भारी पडू शकतो, असे म्हटले जात आहे.

मुंबईचा हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात होणार आहे. क्वॉलिफायर २ मध्ये तेही अहमदाबाद मैदानावर हार्दिक पंड्याच्या संघाचा पराभव करणे मुंबई इंडियन्ससाठी सोपे असणार नाही. पण गेल्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्यावरून रोहित आणि कंपनी धोकादायक झाली आहे. मात्र गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरातकडे अनेक मॅच जिंकून देणारे खेळाडू आहेत. पण त्यांच्यासाठी १२ वा खेळाडू हा सर्वात महत्वाचा असेल. कारण हा १२ वा खेळाडू त्यांना विजय मिळवून देऊ शकतो.

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही चेन्नईपेक्षा नक्कीच वेगळी आहे. मुंबईने यापूर्वी चेन्नईमध्ये विजय मिळवला होता. पण आता त्यांचा सामना हा गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातसाठी यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट असेल ती म्हणजे प्रेक्षक. कारण गुजरातच्या घरच्या मैदानात हा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याला गुजरातचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील. प्रेक्षकांचा पाठिंबा ही फार मोठी गोष्ट क्रिकेटच्या मैदानात असते. त्यामुळे या सामन्यात गुजरातचे प्रेक्षक हे गुजरातच्या १२ व्या खेळाडूची भूमिका पार पाडतील आणि मुंबईच्या संघावर अजून दडपण वाढवतील. त्यामुळे गुजरातचा हा १२ वा खेळाडू मुंबईसाठी भारी पडू शकतो.

मुंबईच्या संघाने एलिमिनेटरमध्ये दमदार कामगिरी केली आणि सर्वांनीच ती पाहिली. आयपीएलच्या १६व्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली होती. एक वेळ अशी होती मुंबईचा संघ नवव्या स्थानावर होती. त्यानंतर मुंबईची गाडी रुळावर आली. घरच्या मैदानासोबत बाहेरच्या मैदानावर देखील त्यांनी विजय मिळवले. मोठ्या लढतीत देखील मुंबईने दमदार कामगिरी केली. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून येथे फलंदाजांचा दबदबा आहे. या मैदानावर संघ धावसंख्येचे पाठलाग करण्यात प्राधान्य देतात. २०० धावांचा पल्ला देखील येथे सहज पार केला जातो. सध्याच्या घडीला मुंबईचे फलंदाज भन्नाट फॉर्मात आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा असेल.

गुजरातच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

2023-05-25T16:49:06Z dg43tfdfdgfd