"गौतम गंभीर तू खेळत नाहीयेस," कोहलीसोबतच्या वादानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं, म्हणाला "गरम डोकं..."

IPL 2023: आयपीएल (IPL) म्हटलं की त्याच्यासोबत अनेक वादही जोडले जातात. आयपीएलमधील मॅच फिक्सिंग, हरभजनने श्रीसंतला लगावलेली कानाखाली असे अनेक वाद गेल्या काही काळात रंगले आहेत. त्यातच सध्याच्या आयपीएलमधील एका वादाची भर पडली आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात झालेल्या वादानंतर क्रिकेटप्रेमींमध्येही दोन गट पडले असून, आपापली मतं नोंदवली जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडू आमने-सामने आले होते. बंगळुरुने हा सामना जिंकल्यानंतर दोन्ही खेळाडू जाहीरपणे आपापसात भिडले होते. या वादानंतर अनेक खेळाडूंनी आपलं मत जाहीर केलं असून, त्यामध्ये आता ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूनेही भाष्य केलं आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा असिस्टंट कोच शेन वॉट्सनने गौतम गंभीर आणि विराट कोहलीमधील वादावर भाष्य केलं असून, मैदानापासून वाद दूर ठेवले पाहिजेत असं म्हटलं आहे. तसंच हा वाद मागे सोडून पुढे वाटचाल करणं दोघांच्याही भल्याचं आहे असं शेन वॉट्ससने म्हटलं आहे. 

"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द

 

"मैदानात स्पर्धात्मक असणं चांगली बाब आहे. माझं त्यासाठी पूर्ण समर्थन आहे. याचवेळी खेळाडू आपली उत्तम कामगिरी करत असतात. यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळते आणि ते आपल्या मेंदूवर लक्ष केंद्रीत करतात. पण जेव्हा मैदानाबाहेर डोकं गरम होऊ लागतं, तेव्हा तुम्ही तिथेच ते सोडून दिलं पाहिजे. मैदानावर तुम्ही अस्तित्व टिकवण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्न करत असता. पण एकदा खेळ संपला की विषयही तिथेच संपला. त्यामुळे सर्व सोडून पुढे गेलं पाहिजे," असं शेन वॉट्ससने The Grade Cricketer च्या पॉडकास्टमध्ये सांगितलं. 

"विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जे काही झालं त्यातील वाद कायम राहावा अशी इच्छा नाही. गौतम गंभीर सध्या खेळतही नाही आहे," असं वॉट्सनने म्हटलं आहे. 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगननेही गौतम गंभीरवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. मैदानात खेळाडूंमध्ये वाद होऊ शकतात, पण प्रशिक्षकांनी यामध्ये पडू नये असं त्याने म्हटलं आहे.

"मैदानात छोटे-मोठे वाद होण्यात मला काही गैर वाटत नाही. शेवटी हा फक्त खेळ आहे. प्रत्येक दिवशी असं व्हावं ही इच्छा नाही, पण यामध्ये प्रशिक्षकांनी भाग घेणं मला आवडलं नाही. प्रशिक्षक किंवा प्रशिक्षण विभागातील कोणतीही व्यक्ती खेळात सहभागी होण्याचं कारण मला दिसत नाही. जर दोन खेळाडूंमध्ये वाद असेल तर तो त्यांनीच सोडवला पाहिजे. प्रशिक्षक डगआऊट किंवा ड्रेसिम रुममध्ये असले पाहिजे. त्यांचं काम धोरणं ठरवणं आहे," असं मायकल वॉगगने म्हटलं आहे.

2023-05-06T08:55:54Z dg43tfdfdgfd