विनायक राणे : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या दुखापतीमुळे आता जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाठीत उसण असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. तो इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या वेळीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स करंडक वनडे स्पर्धा लक्षात घेऊन बुमराह हा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे आता सूत्रांनी सांगितले आहे.बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एकूण ३२ फलंदाज बाद केले. त्याने या मालिकेत सर्वाधिक १५० षटके मारा केला. त्याचा ताण पाठीवर आला. तो चॅम्पियन्स वनडे क्रिकेट स्पर्धेपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वैद्यकीय समिती प्रयत्न करणार आहे. त्याची दुखापत पहिल्या श्रेणीतील असल्यास दोन ते तीन आठवड्यांची पुनर्वसन प्रक्रिया आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी तिसऱ्या श्रेणीची असल्यास त्याच्यावर तीन महिने उपचार होतील. अर्थात, बुमराहच्या दुखापतीची नेमकी तीव्रता पूर्ण तपासणीनंतरच कळणार आहे. चॅम्पियन्स स्पर्धेतील भारताची सलामीची लढत दुबईत २० फेब्रुवारीस आहे. बुमराह इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही, याचे संकेत मिळाले होते. मात्र, चॅम्पियन्स स्पर्धा लक्षात घेऊन तो वनडे लढतीत खेळणार असल्याची चर्चा होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका २२ जानेवारीपासून आहे. ही मालिका पाच लढतींची आहे. त्यातील शेवटची लढत दोन फेब्रुवारीस मुंबईत आहे. भारत-इंग्लंड वनडे मालिका ६ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. त्यातील पहिली लढत नागपूरला आहे.