टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाचा दणदणीत विजय

IND VS SA : रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी भारतीय संघाने 350 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात आली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं आणि त्यामुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला. परिणामी टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

रांची स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला रविवार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1: 30 वाजता सुरुवात झाली. यावेळी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. मात्र यशस्वी 18 धावा करून बाद झाला त्यामुळे विराट कोहली मैदानात आला. रोहित शर्माने विराटसोबत चांगली पार्टनरशिप केली. मात्र 51 बॉलमध्ये 57 धावा करून तो बाद झाला. यावेळी त्याने 5 चौकार आणि 3 सिक्स मारले. यासह रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नावावर केला. रोहित शर्माने वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 352 सिक्स ठोकले असून त्यामुळे सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे.रोहित बाद झाल्यानंतर सुद्धा विराट कोहलीने मैदानात आपली दमदार फलंदाजी सुरु केली. त्याने 101 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. हे शतक विराटच्या वनडे कारकिर्दीतील 52 वं तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठरलं.  त्यानंतर टीम इंडियाकडून केएल राहुल (60) आणि रवींद्र जडेजा (32) यांनी सुद्धा दमदार फलंदाजी केली. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या होत्या. 

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पूर्ण करत असताना मॅथ्यू ब्रीट्झके (72) आणि माक्रो जॅनसनने (70) सर्वाधिक धावांची कामगिरी केली. परंतू टीम इंडियाचे गोलंदाज त्याच्यावर भारी पडताना दिसले. कुलदीप यादवने 4, हर्षित राणाने 3, अर्शदीप सिंहने 2 तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ऑल आउट करून 332 धावांवर रोखले. 

 

2025-11-30T17:09:29Z