टीम इंडियाला धोक्याची घंटा; सगळे सामने जिंकूनही भारतीय संघ केवळ पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडणार..

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या स्पर्धेत सुपर-८ गटात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वपूर्ण लढत बोसेजु स्टेडियमवर रंगणार आहे. सेमी फायनल प्रवेशासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय महत्वाचा आहे तरच भारतीय संघ सेमी फायनलमध्ये आपले स्थान पक्के करेल. भारताला जर सेमी फायनलच्या लढतीतून बाजूला काढायचे असल्यास ऑस्ट्रेलियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

मोठ्या स्पर्धेत जर एखादा सामना काही करणास्थव रद्द झाला तर राखीव दिवशी तो सामना खेळवला जातो. प्रत्येक संघ संघर्ष करत निर्णायक फेरीत पोहोचलेला असतो असा परिस्थितीत पावसाने बाधा आणल्यास सगळ्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. हे सगळं लक्षात घेऊन सेमी फायनल, फायनल अशा मोठ्या सामन्यांना राखीव दिवसाची सोय केली जाते. उदाहरणार्थ २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना दोन दिवस खेळवला गेला होता. या वर्ल्डकपमध्ये या राखीव दिवसाबाबत मोठा बदल दिसून येत आहे तो म्हणजे वेस्ट इंडिजमध्ये आयोजित टी-२० वर्ल्डकपमधल्या गयाना इथे होणाऱ्या सेमी फायनलसाठी राखीव दिवसाची सोय नाही.

भारत गयाना इथे होणारा सेमी फायनलचा सामना खेळणार हे आता जवळ जवळ पक्केच झाले आहे. सेमी फायनल सामना २७ तारखेला आणि फायनल २९ तारखेला ब्रिजटाऊन इथे होणार आहे. भारतीय संघाच्या सेमी फायनलला राखील दिवस ठेवला तर हा सामना २८ तारखेला खेळवण्यात येईल. भारतीय संघाने फायनलमध्ये स्थान पटकावले तर टीम इंडियाला गयानाहून ब्रिजटाऊनला जावे लागणार आणि त्या प्रवासासाठी पुरेसा वेळही लागणार. राखीव दिवस ठेवला तर गयाना ते ब्रिजटाऊन प्रवासाचे गणित किचकट होणार हे ध्यानात घेऊन भारताच्या सेमी फायनलला राखीव दिवस देण्यात आलेला नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४च्या प्लेइंग कंडिशन्सनुसार, भारतीय संघाच्या सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर निर्धारित वेळेपेक्षा २५० मिनिटे अतिरिक्त मिळतील. या अडीचशे अतिरिक्त मिनिटात सामना संपवणे अपेक्षित आहे. स्पर्धेत आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पावसाचे सावट पाहायला मिळाले अशा परिस्थितीत सेमी फायनलसारख्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी राखीव दिवस असणे गरजेचे आहे भारताला पावसाचा मोठा धोका बसू शकतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-24T09:07:46Z dg43tfdfdgfd