तिलक वर्माचं झालं ऑपरेशन, न्यूझीलंड सीरिजमधून होणार बाहेर, अचानक नेमकं काय झालं?

Tilak Verma Health Updates: टीम इंडियाचा स्टार युवा क्रिकेटर तिलक वर्मा (Tilak Verma) याचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार तिलक वर्मा यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 सीरिजमधून बाहेर पडला आहे. 21 जानेवारी पासून टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. संबंधित याबाबतीत बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तिलक वर्माच्या तब्येतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. 

तिलक वर्माला नेमकं काय झालं? 

टेस्टिकुलर टॉर्शनच्या समस्येमुळे 7 जानेवारीच्या सकाळी राजकोट येथे नाश्ता केल्यावर तिलक वर्माला शरीराच्या खालच्या भागाला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे तपासणी केल्यावर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी तिलक वर्मा हा विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद संघासोबत राजकोट येथे होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितलं तिलक वर्मा वेदनेत असताना त्याला लगेचच गोकुळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. चाचण्या आणि स्कॅनमधून असे दिसून आले की तिलकला टेस्टिक्युलर टॉर्शन आहे, ही अशी स्थिती आहे जी अचानक, तीव्र वेदनांमुळे होते. डॉक्टरांनी तिलकला विलंब न करता ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.

आता कशी आहे तिलकची तब्येत? 

तिलक वर्माचं ऑपरेशन यशस्वी झालं असून तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आणि त्यांनी निर्णयाला सहमती दर्शवली अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.  तिलक वर्माची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता त्यांची प्रकृती चांगली आहे. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय पॅनेलशी चर्चा केल्यानंतर, तिलक यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि मैदानात परतण्या संदर्भात संभाव्य माहिती मिळताच, ती शेअर केली जाईल.

हेही वाचा : क्रिकेटच्या मैदानावर उतरणार बॉलिवूड, हनी सिंह सोबत 'या' अभिनेत्री करणार परफॉर्म, कुठे पाहाल Live?

 

वर्ल्ड कप सामान्यांना सुद्धा मुकणार तिलक? 

21 जानेवारी पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांची ही सीरिज तिलक वर्मा ऑपरेशन झाल्यामुळे मुकू शकतो. ही सीरिज आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीची तयारी असणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारी पासून टी 20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना हा यूएसए विरुद्ध होईल. मात्र तिलक वर्मा हा सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ : 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर. 

2026-01-08T11:39:32Z