धोनीची जादू चालणार की हार्दिक ठरणार वरचढ? चेपॉकवर हे असतील दोन्ही संघांचे एक्स फॅक्टर

चेन्नई: आयपीएल २०२३ मध्ये आज फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ मिळणार आहे. चेन्नईमधील चेपॉक येथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील स्पर्धेतील क्वालिफायर-१ सामना आज रंगणार आहे. टेबल टॉपर्स दोन्ही संघ मजबूत स्थितीत असून दमदार फॉर्मात आहेत आणि विजेत्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल, तर पराभूत संघाला क्वालिफायर-२ द्वारे अंतिम फेरी गाठण्याची अतिरिक्त संधी मिळेल.

एकीकडे एमएस धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे, तर दुसरीकडे हार्दिक पंड्या आहे, ज्याने पहिल्या सत्रातच विजेतेपद पटकावले आहे. पंड्या सिनियर पार्टनर धोनीला आपला गुरू मानतो आणि त्याच्याप्रमाणेच त्याला भारतीय क्रिकेट संघात फिनिशरची भूमिका बजावायची आहे. धोनीप्रमाणे शांत राहून कर्णधारपदावर त्याचा विश्वास आहे. आता दोघेही आमनेसामने असल्याने ही स्पर्धा रंजक होण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही संघ टेबल टॉपर आहेत, त्यामुळे ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हे उघड आहे. दोन्ही संघांमध्ये मोठे हिटर आहेत, तर फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा हंगल मेळ दोन्ही संघात आहे. एका बाजूला राशिद खान आणि दुसऱ्या बाजूला जडेजा आहे. शमी आणि मोहित सीएसकेच्या पाथीराना, दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांच्याशी भिडताना दिसणार आहेत. कर्णधाराची रणनीती खूप महत्त्वाची ठरेल. चेन्नईचे घरचे मैदान असल्याने सीएसकेला होम सपोर्ट असणार आहे.

दोन्ही संघांची कमकुवत बाजू

आकडेवारीचा विचार करता हार्दिक पंड्याचा संघ धोनीच्या CSK वर थोडा जड आहे. वास्तविक, दोघांमध्ये ३ सामने खेळले गेले आहेत आणि तिन्ही गुजरातने जिंकले आहेत. दुसरीकडे, सामना चेन्नईत असल्याने हार्दिकच्या संघाला येथे फारसा अनुभव नसेल. चेन्नईसाठी हा प्लस पॉइंट असेल.

कोण आहेत दोन्ही संघाचे एक्स फॅक्टर

शुभमन गिलने ज्या पद्धतीने दोन लागोपाठ शतके झळकावली, त्यावरून गिलला वेळीच वेसण घालणं धोनीचे लक्ष्य असेल. गिलमध्ये एकट्याने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची ताकद आहे. दुसरीकडे, धोनीची रणनिती आणि त्याचा अनुभव सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. मधल्या षटकांमध्ये तो फिरकीपटूंचा कसा वापर करतो हे पाहणे रंजक ठरेल.

2023-05-23T05:18:13Z dg43tfdfdgfd