धोनीने फक्त ४-५ मिनिटंच अंपायरशी का वाद घातला? नेमका काय आहे क्रिकेटचा हा नियम

चेन्नई: धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला विनाकारण चॅम्पियन्स संघ म्हणत नाहीत. १४ सिझन, १२ वेळा प्लेऑफमध्ये आणि १०व्यांदा आता थेट अंतिम फेरीचं तिकीट. हे सगळं चेन्नईचा आयपीएलमधील प्रवास सांगण्यासाठी पुरेसे आहे. पण यंदाच्या अंतिम फेरीत जाताना एक वाद झालेला पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायरमध्ये जेव्हा धोनी अंपायरशी वाद घालताना दिसला तेव्हा नवीन वाद निर्माण झाला. हा वाद होता पथिरानाला गोलंदाजी देण्यावरून निर्माण झाला होता, ज्यावरून धोनी अंपायरशी भिडला.

लाईव्ह सामान्यातच धोनीने अंपायरशी केलेला वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण, धोनी विनाकारण काहीही करत नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाद केवळ ४ ते ५ मिनिट झाला. त्यामुळे याबाबत क्रिकेटचा एक नियम आहे, जो धोनीला चांगलाच समजलेला दिसतो. वाद झाला तर झाला पण केवळ इतकेच मिनिटे धोनीने हुज्जत घातली आणि नंतर का थांबला?

गुजरातच्या डावातील १६व्या षटकात काय घडलं?

IPL 2023 चा पहिला क्वालिफायर चेन्नईच्या मैदानावर २३ मे रोजी संध्याकाळी खेळला गेला, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. पण, धोनीने पंचांसोबत केलेली घटना या सामन्यात गुजरातच्या डावाच्या १६ व्या षटकात घडली. त्याचे असे झाले की, धोनीला गुजरातच्या डावातील १६वे षटक त्याचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाकडून टाकायचे होते. पण, मैदानावरील पंचांनी त्याला तसे करण्यास नकार दिला. धोनीने स्क्वेअर लेग अंपायरशी याबाबत चर्चा सुरू केली. यात त्यांचे दोन-तीन सहकारीही सहभागी झाले. तोपर्यंत खेळ थांबला आणि सीएसकेचे काम होईपर्यंत हा अडथळा कायम होता.

प्रश्न असा आहे की जर धोनीला पाथिरानाकरवून गोलंदाजी करायची होती, तर अंपायरने त्याला का रोखले? कारण त्याआधी पाथिराना मैदानाबाहेर गेला होता. आता तो मैदानावर नसताना सरळ गोलंदाजी करायला आला हे काही क्रिकेटच्या नियमीत बसत नाही. क्रिकेटचे नियम याला परवानगी देत नाहीत आणि याच कारणामुळे पंचही नकार देत होते.

काय सांगतो क्रिकेटचा नियम?

नियमांनुसार, जितका वेळ गोलंदाज ब्रेकवर राहतो, तेवढाच वेळ मैदानावर घालवल्यानंतरच तो पुन्हा गोलंदाजी करू शकतो. इथे धोनीमुळेच त्याचा मनसुबा साध्य झाला. सीएसकेचा कर्णधार आणि पंच यांच्यात वाद सुरू झाला तोपर्यंत पाथिरानाचा मैदानावरचा वेळ पूर्ण झाला होता. याचा अर्थ तो आता पुन्हा गोलंदाजी करू शकत होता, जे त्याने केले.

2023-05-24T07:18:38Z dg43tfdfdgfd