चेन्नई : नशिब जेव्हा साथ देतं तेव्हा काहीही घडू शकतं आणि हीच गोष्ट ऋतुराज गायकवाडबाबतही पाहायला मिळाली. ऋतुराजला यावेळी पंचांची चांगलीच मदत मिळाली आणि त्याने या सामन्यात इतिहास रचला. क्वालिफायर १ च्या सामन्यात सर्वांच्या नजरा या ऋतुराज गायकवाडवर लागल्या होत्या. कारण ऋतुराजने यापूर्वी गुजरातविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत अर्धशतकं झळकावली होती. या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले आणि ही त्याची सलग चौथी हाफ सेंच्युरी ठरली. पण ऋतुराजला यावेळी पंचांची मदत कशी झाली, याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली ती दुसऱ्याच षटकात. त्यावेळी गुजरातच्या संघाकडून पहिलाच सामना खेळणारा दर्शन नळकांडे गोलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चेन्नईचा ऋतुराज गायकवाड हा फलंदाजी करत होता. ऋतुराज या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण त्याचे टायमिंग चुकले आणि त्याला मोठा फटका मारता आला नाही. ऋतुराजचा हा चेंडू हवेत उडाला. गिल हा झेल पकडण्यासाठी पुढे सरसावला. गिलने यावेळी कोणतीही चूक केली नाही आणि त्याने हा झेल पकडला. त्यामुळे गुजरातचा संघ हा सेलिब्रेशन करत होता. पण त्याचवेळी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली. पंचांनी यावेळी ऋतुराजला बाद दिले नाही, कारण ज्यावेळी दर्शनने चेंडू टाकला तेव्हा त्याचा पाय लाइनच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल दिला. नो बॉलवर फलंदाज फक्त रन आऊट झाला तर त्याला बाद दिले जाते. पण ऋतुराज झेल बाद झाला होता. त्यामुळे ऋतुराजला यावेळी नाबाद ठरवले गेले. ऋतुराजचे नशिब यावेळी चांगलेच फळफळले. ऋतुराजने या जीवदानाचा चांगलाच फायदा घेतला. कारण या नो बॉलनंतर फ्री हीट देण्यात आली होती आणि त्यावर ऋतुराजने षटकार लगावला.
एकीकडे ऋतुराजला दिलासा मिळाला खरा, पण दुसरीकडे दर्शनसारख्या नव्या गोलंदाजाला पहिली विकेट मिळू शकली नाही आणि त्यामुळे तो नाराज झाला. पण खेळामध्ये या गोष्टींना जागा नसते. कारण निराश झाल्यावरही दर्शनला पुन्हा गोलंदाजी करावी लागली. त्यानंतर दर्शनला यश मिळाले नाही आणि त्याची लयही बिघडली.
नो बॉलवर ऋतुराजला दुसऱ्या षटकात जीवदान मिळाले. या गोष्टीचा चांगलाच फायदा त्याने घेतला. कारण त्यानंतर पहिल्या पॉवर प्लेपर्यंत चेन्नईला एकही धक्का बसला नाही. चेन्नईने पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिन बाद ४९ धावा केल्या आणि यामध्ये ऋतुराजचा वाटा हा ३३ धावांचा होता.
2023-05-23T15:03:27Z dg43tfdfdgfd