न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी रोहित आणि विराट आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोणत्या स्थानावर?

ICC Ranking : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS NewZealnad) यांच्यात 11 जानेवारी रोजी वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून ते वनडे सह तीन सामान्यांची टी 20 सीरिज सुद्धा खेळणार आहेत. रविवार पासून सुरु होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सुद्धा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे विराट - रोहितचे फॅन्स उत्साहात आहेत. अशातच आयसीसी रँकिंगमध्ये विराट आणि रोहित यांची स्थिती काय आहे, ते कोणत्या स्थानावर आहेत याविषयी जाणून घेऊयात.  

2026 वर्षाला सुरुवात झाली मात्र अद्याप एकही वनडे सामना खेळवला गेलेला नाही. आयसीसीने 6 डिसेंबर 2025 रोजी वनडे रँकिंग अपडेट केली होती, त्यात अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत. आता जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) 11 जानेवारी रोजी न्यूझीलंड विरुद्ध पहिला सामना खेळतील त्यानंतरच रँकिंग आणि रेटिंगमध्ये बदल होणार आहेत. दरम्यान या दोन्ही फलंदाजांच्या सध्याच्या क्रमवारीबद्दल जाणून घ्या.

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण कुठे? 

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सध्या टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा नंबर १ वर आहे. त्यांची रेटिंग सध्या 781 वर असून रोहितने काहीच दिवसांपूर्वी पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी तो एक आठवड्यासाठी खाली घसरला होता, पण त्याने पुनरागमन केलं आणि आतापर्यंत त्याने रँकिंगमध्ये नंबर 1 चं स्थान कायम ठेवलंय. तर विराट कोहली आयसीसी रँकिंगमध्ये नंबर २ वर आहे. विराट रेटिंग 773 सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित आणि विराटच्या रेटिंगमध्ये फार फरक नाही. वनडे सीरिज संपल्यावर कोणता खेळाडू पुढे येतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

हेही वाचा : तेंडुलकर कुटुंबात लवकरच वाजणार सनई चौघडे, कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी सानिया?

 

विजय हजारे ट्रॉफीत लगावलं होतं शतक : 

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज फलंदाजांनी मागील महिन्यात विजय हजारे ट्रॉफीचे प्रत्येकी दोन सामने खेळले. यातील पहिल्या सामन्यात दोघांनीही शतकीय कामगिरी केली होती. बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंड 1 मध्ये 24 डिसेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश सामन्यात विराटने 83 बॉलमध्ये विराटने हे शतक पूर्ण केले. त्याने त्या सामन्यात 131 धावांची खेळी केली होती. तर 26 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात विराटने 77 धावा केल्या. रोहित शर्माने 24 डिसेंबर रोजी सिक्कीम विरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 155 धावांची खेळी केली होती. उत्तराखंड विरुद्ध तो खातं सुद्धा उघडू शकला नाही. आता विराट आणि रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचं  वेळापत्रक : 

11 जानेवारी : पहिला वनडे : बीसीए स्टेडियम, वडोदरा

14 जानेवारी : दुसरा वनडे  : निरंजन शाह स्टेडियम, राजकोट

18 जानेवारी : तिसरा वनडे  : होळकर स्टेडियम, इंदूर

2026-01-07T15:24:32Z