निवृत्ती घेऊ नका, आमचं ऐका, पुढचा वर्ल्डकप भारतात, रोहित-विराटला सगळे समजावत होते, ड्रेसिंग रुममधला प्रसंग सूर्याने सांगितला

मुंबई : भारतीय संघाने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप उंचावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, पंचतारांकित फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यांनी लगेचच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वैयक्तिक विक्रमांच्या मोहात न पडता कोहलीपाठोपाठ रोहित शर्मा आणि जाडेजानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत नव्या पिढीसाठी भारतीय संघाचे दार खुले केले. त्यांच्या निवृत्तीवरून चर्चा सुरु असताना सूर्यकुमार यादव याने ड्रेसिंग रुममधला किस्सा शेअर केला आहे.

सूर्याने ड्रेसिंग रुममधला किस्सा सांगितला

गेल्या तेरा वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला हुलकावणी देणारा विश्वकरंडक भारताने उंचावल्यानंतर सगळेच जण भावुक झाले होते. गत काही वर्षातील सगळ्यांची मेहनत फळाला आली होती. प्रत्येकाला भरुन आले होते. सगळ्यांच्या भावना दाटू आलेल्या होत्या. विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये, यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही, असे सूर्यकुमारने सांगितले.

विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर किंवा एखादी मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचक्षणी निवृत्तीची घोषणा करणे प्रचंड कठीण असते. परंतु त्या आनंदाच्या क्षणी निवृत्ती घोषित करणे ही चांगलीही गोष्ट आहे, ती त्यांनी केली. आम्ही सगळे अगोदरच भावुक झालो होतो. त्यात रोहित आणि विराटने निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांनाच गलबलून आले. तुम्ही दोघेही आत्ता निवृत्ती घेऊ नका, पुढची २ वर्षे थांबा, भारतातच पुढचा टी ट्वेन्टी विश्वचषक होतोय, तुम्ही तुमच्या निर्णयावर फेरविचार करावा, असे आम्ही त्यांना समजावले. परंतु त्यांनी मानले नाही. कदाचित त्यांचा निर्णय आधीच झाला असावा, असे सूर्यकुमारने सांगितले.

टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी १२५ कोटींचे बक्षीस जाहीर केले. वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हलव मैदानावर पार पडलेल्या अंतिम फेरीत तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने २००७ नंतर १७ वर्षांनी दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला.

जय शाह काय म्हणाले?

‘भारतीय संघाने टीकाकारांना कामगिरीतून उत्तर दिले आहे. त्यांची ही वाटचाल प्रेरणादायी असून, हे सगळे जण महान खेळाडूंच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत’, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत शहा यांनी बक्षिसाची घोषणा केली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T04:34:12Z dg43tfdfdgfd