Sad News From Crickte World: भारतीय अंडर-१९ संघातून वर्ल्ड कप खेळलेले त्रिपुराचे माजी ऑलराउंडर राजेश बानिक यांचा पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने राज्यातील क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राजेश बानिक यांनी २००२-०३ हंगामात त्रिपुराकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्या काळात ते राज्यातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये गणले जात. त्यांनी ४२ फर्स्ट क्लास सामन्यांत एकूण १४६९ धावा केल्या, तर २४ लिस्ट-ए सामन्यांत ३७८ धावा केल्या असून त्यात एक शतकही आहे. त्यांचा सर्वोच्च स्कोअर १०१ धावा होता. याशिवाय त्यांनी १८ टी२० सामने खेळले ज्यात त्यांनी २०३ धावा केल्या.
उत्कृष्ट फलंदाजीसोबतच राजेश बानिक लेग-ब्रेक स्पिन गोलंदाजीसाठीही ओळखले जात. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ८ बळी नोंदले गेले आहेत, तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी २ गडी बाद केले. खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कौशल्यामुळे त्यांची राज्याच्या अंडर-१९ संघाच्या निवड समितीत नियुक्ती करण्यात आली होती.
१२ डिसेंबर १९८४ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतला येथे जन्मलेल्या राजेश बानिक यांनी २००० साली भारतीय अंडर-१५ संघासोबत इंग्लंड दौऱ्यात सहभाग घेतला होता. त्या वेळी अंबाती रायडू आणि इरफान पठाण यांच्यासारखे खेळाडू त्यांच्या संघात होते. त्यांनी विजय मर्चंट ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सीके नायडू ट्रॉफी, एम.ए. चिदंबरम ट्रॉफी यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये त्रिपुराचे प्रतिनिधित्व केले.
अगरतला येथे बंगालविरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात त्रिपुराच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून राजेश बानिक यांना श्रद्धांजली वाहिली. त्रिपुरा क्रिकेट संघटनेतर्फे शनिवारी त्यांच्या मुख्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संघटनेचे सचिव सुब्रत डे यांनी म्हटलं, “एक गुणी क्रिकेटपटू आणि अंडर-१६ संघाचे निवडकर्ते गमावल्याचं आम्हाला दु:ख आहे. आम्ही सर्वजण स्तब्ध आहोत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”
2025-11-02T15:54:29Z