India Women Win First Cricket World Cup Virat Kohli Sachin Tendulkar Modi React: नवी मुंबईच्या डी. व्हाय. पाटील स्टेडियममध्ये रविवारी रात्री इतिहास घडला. भारतीय महिला संघाने आपल्या जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर पहिल्यांदाच महिला विश्वचषकावर नाव कोरलं. भारताने अंतिम सामन्यामध्ये 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही हा क्षण अनुभवण्यासाठी मैदानात उपस्थित होता. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतीय महिला संघाचं अभिनंदन केल्याचं दिसून येत आहे. भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीनेही भारताच्या या विजयानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संघाचं कौतुक केलं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय महिला संघाचं कौतुक केलं आहे. "1983 या वर्षाने एका संपूर्ण पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा दिली. आज, आपल्या महिला क्रिकेट संघाने खरोखरच काहीतरी खास केले आहे. त्यांनी देशभरातील असंख्य तरुणींना बॅट आणि बॉल उचलण्याची, मैदानात उतरण्याची आणि एक दिवस त्याही तो ट्रॉफी उचलू शकतात असा विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातील हा एक निर्णायक क्षण आहे," असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. "छान, टीम इंडिया. तुमच्यामुळे संपूर्ण देशाचा उर अभिमानाने भरुन आला आहे," असं सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विराटच्या अकाऊंटवरुन रात्री 12 वाजून 21 मिनिटांनी करण्यात आलेल्या पोस्टसोबत भारतीय संघ सेलिब्रेट करत असल्याची टीव्हीवरील दृष्यांचा फोटो जोडण्यात आला आहे. या फोटोला विराटने भावनिक कॅप्शन दिली आहे. "मुलींनी इतिहास रचला. इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमाला अखेर प्रत्यक्षात उतरताना पाहून एक भारतीय म्हणून मला फार अभिमान वाटतोय. या ऐतिहासिक कामगिरीसाठी हरमन आणि संपूर्ण टीमचे कौतुक आणि खूप खूप अभिनंदन करायला हवे," असं विराटने म्हटलं आहे.
विराट भारतीय महिला खेळाडूंसोबतच सहाय्यक टीम आणि इतरांनाही विसरलेला नाही. "तसेच पडद्यामागील कामासाठी संपूर्ण टीम आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन. शाब्बास इंडिया. या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या. हे आपल्या देशातील मुलींच्या पिढ्यांना हा खेळ स्वीकारण्यास प्रेरित करेल. जय हिंद!" असं विराटने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी, "आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय झाला. अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी उत्तम राहिली. कौशल्य आणि आत्मविश्वपूर्वक कामगिरी त्यांनी केली. संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि दृढनिश्चय पाहायला मिळाला. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरित करेल," असा विश्वास एक्सवरुन पोस्ट करताना व्यक्त केला.
2025-11-03T01:24:33Z