Sunil Gavaskar On Coach Gautam Gambhir: भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत 0-2 असा लाजिरवाणा पराभव झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेचा धनी ठरत आहे. सातत्याने फलंदाजीच्या क्रमात केलेले बदल, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा करण्याची गंभीरची भूमिका टीकेचा विषय ठरत आहेत. अगदी गंभीरला बीसीसीआयने तातडीने प्रशिक्षक पदावरुन बाजूला करावं अशी मागणीही होताना दिसत आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारताने 10 कसोटी सामने गमावले आहेत. गंभीरबद्दल चाहत्यांच्या मनात रोष असतानाच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी गंभीरची पाठराखण केली आहे.
सुनील गावस्कर यांनी भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेच्या निकालानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या भूमिकेबद्दल मतप्रदर्शन केलं. गावसकर यांनी गंभीरची जोरदार पाठराखण केली. पराभवाची जबाबदारी फक्त गंभीरवर नसून, खेळाडूंवर आहे, असं परखड मत गावसकरांनी मांडलं. एवढेच नाही तर त्यांनी टीकाकारांना प्रश्न विचारताना, "चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्यानंतर गंभीरला श्रेय का दिले नाही? तेव्हा त्याला टीम इंडियाचा आजीवन कोच बनवा म्हणून का मागणी केली नाही? आता हारले म्हणून फक्त त्याला दोष देणे चुकीचे आहे," असं मत व्यक्त केलं.
प्रशिक्षक फक्त संघाला तयार करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, पण मैदानावर 22 यार्डवर उतरून खेळ खेळणे हे खेळाडूंचे काम आहे, हा मुद्दाही गावसकरांनी उपस्थित केला. "गंभीर प्रशिक्षक आहेत. तो संघ तयार करू शकतो, अनुभव सांगू शकतो पण मैदानावर खेळाडूंनीच खेळायचे असते. संघ जिंकला तर प्रशिक्षकाकडे पाहिले जात नाही, फक्त हरला तरच त्याच्याकडे बोट दाखवले जाते," असं गावसकर 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
नक्की वाचा >> 'रोहित-विराट असते तर भारताने...'; 'त्या' दाव्यावरुन गावसकरांचा संताप! 'रिटायरमेंटचा...'
पुढे गावसकरांनी ब्रँडन मॅक्युलमचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये एकच प्रशिक्षक तिन्ही प्रकारांसाठी संघ घडवतोय. त्याप्रमाणे गंभीरलाही तीनही फॉर्मेटसाठी प्रशिक्षक कायम ठेवणे चुकीचे वाटत नसल्याचं गावसकरांनी म्हटलं. हे विधान गंभीरवर होणाऱ्या तीव्र टीकेच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. गुवहाटी कसोटीनंतर भारतीय चाहत्यांनी मैदानातच गंभीरविरुद्ध "गौतम गंभीर हाय हाय" अशी घोषणाबाजी केली. गावस्कर यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली. त्यांनी या घोषणाबाजीला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देताना, टीका करणाऱ्यांनी संतुलित दृष्टिकोन ठेवावा आणि विजय-पराभव दोन्ही वेळी समान मूल्यमापन करावे," असा सल्ला दिला.
तसेच कसोटी क्रिकेटच्या भवितव्यासाठी माजी क्रिकेटपटू आणि कर्णधारांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची गरज असल्याचंही गावसकरांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
2025-11-30T05:09:31Z