"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द

IPL 2023 Controversy: आयलीएलमध्ये बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान झालेल्या वादाची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. मैदानात विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) एकमेकांशी भिडल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरुन चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. वर्ल्डरप विजेत्या संघाचा भाग असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंच्या वर्तनावर टीका केली जात आहे. यावरुन चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान मैदानात नेमकं काय झालं होतं याची चर्चा सुरु आहे. गौतम गंभीर आणि विराटमध्ये शाब्दिक चकमक झाली असली, तरी ते एकमेकांना नेमकं काय म्हणाले हे समजलं नव्हतं. दरम्यान संघाचा डगआऊटमध्ये असणाऱ्या एका साक्षीदाराने पीटीआयशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम उलगडला आहे. 

"तुम्ही टीव्हीवर सामन्यानंतर मेयर्स आणि विराट काही मीटर अंतर ठेवत चालत असल्याचं पाहिलं असेल. मेयर्स विराट कोहलीला तू वारंवार आमच्याशी गैरवर्तन का करत होतास अशी विचारणा केली. त्यावर विराटने, तू माझ्याकडे का पाहत होतास? असं विचारलं. त्याआधी अमित मिश्राने अम्पायरकडे विराट कोहली वारंवार नवीन उल-हकशी गैरवर्तन करत असल्याची तक्रार केली होती," अशी माहिती त्याने दिली आहे. 

"गोष्टी हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर गौतम गंभीरने मेयर्सला बाजूला नेलं आणि संभाषण करु नको असं सांगितलं. त्यावर विराटने कमेंट केली. त्यानंतर जे काही झालं ते बालिश होतं," असं त्याने सांगितलं.

"गौतम गंभीरने विराटला म्हटलं की, काय बोलतोयस, बोल...त्यावर विराटने उत्तर दिलं की, मी तुम्हाला काही बोलत नाही आहे. तुम्ही कशाला रागावत आहात. (Why are you coming in between when I haven't told you anything) त्यावर गौतम गंभीरने म्हटलं की, तू जर माझ्या खेळाडूला बोलला असशील तर तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली आहेस (You abused my player and that's like abusing my family). त्यावर विराटने मग आपल्या कुटुंबाला सांभाळून ठेवा असं उत्तर दिलं" (Then you take care of your family).

"एकमेकांपासून दूर जाण्याआधी गौतम गंभीरने विराटला आता तू मला शिकवणार का? अशी विचारणा केली," अशी माहिती साक्षीदाराने दिली आहे. हा सर्व प्रकार दोन्ही बाजूंनी बालिशपणाचा वाटत होता असंही त्याने म्हटलं. 

2023-05-03T02:09:47Z dg43tfdfdgfd