रोहित, विराटबद्दल जय शहांकडून महत्त्वाची अपडेट; टीम इंडिया आणखी एक ट्रॉफी जिंकणार?

मुंबई: भारतानं दक्षिण आफिकेवर ७ धावांनी सनसनाटी विजय मिळवत टी-२० वर्ल्डकप जिंकला. तब्बल १७ वर्षांनी भारतानं टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहांनी रोहित शर्मा आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा संपन्न होईल. या स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार असल्याची माहिती जय शहांनी दिली आहे. कॅरेबियन बेटांवर आयोजित करण्यात आलेल्या टी-२० स्पर्धेत भारतानं दिमाखदार कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला. अशी कामगिरी आजवर कोणत्याही संघाला जमलेली नाही.

भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकावी, अशी इच्छा जय शहांनी बोलून दाखवली. 'भारतानं सगळ्या स्पर्धा जिंकाव्यात. मोठ्या स्पर्धांची जेतेपद खिशात घालावीत, हीच माझी इच्छा आहे. आपली बेंच स्ट्रेंथ सर्वोत्तम आहे. या संघातले केवळ तीन खेळाडू झिम्बाब्वेला जाणार आहेत. गरज पडलीच तर आपण तीन संघ खेळवू शकतो,' असं शहा म्हणाले.

'या संघाची प्रगती पाहता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हेच आता आपलं लक्ष्य आहे. तिथे हाच संघ खेळेल. वरिष्ठ खेळाडू या संघाचा भाग असतील,' असं शहांनी सांगितलं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आजी माजी कर्णधार खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप जिंकला. २०१३ पासून भारताला आयसीसी आयोजित एकही स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची कामगिरी रोहितसेनेनं करुन दाखवली. २०१३ मध्ये भारतानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी भारतानं इंग्लंडचा पराभव केला होता. पावसानं व्यत्यय आणल्यानं हा सामना २० षटकांचा करण्यात आला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T06:34:33Z dg43tfdfdgfd