'विराटसाठी रेकॉर्ड बनवणं चहा एवढं सोपं...', रांचीतील शतकानंतर सेहवागने कोहली विषयी काय म्हटलं?

IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात रांची येथे तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिला सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने त्यांना विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. यात संघाकडून सर्वात मोठी कामगिरी दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने केली. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 120 बॉलमध्ये 135 धावा केल्या आणि त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठोकलं. यासह विराटने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर विराटचं भरभरून कौतुक केलं. 

विराट कोहलीचं 83 वं शतक : 

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. विराट कोहलीने रांचीच्या मैदानात दमदार फलंदाजी केली. त्याने 101 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. हे शतक विराटच्या वनडे कारकिर्दीतील 52 वं तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठरलं. विराटने हे शतक पूर्ण केल्यावर मैदानात जल्लोष केला. त्याने आकाशाला पाहून देवाचे आभार मानले आणि गळ्यातील लॉकेटचं चुंबन घेतलं. विराट कोहली हा 120 बॉलमध्ये 135 धावा करून बाद झाला. दरम्यान त्याने 11 चौकार आणि 7 सिक्स ठोकले. 42.5 ओव्हर सुरु असताना विराट नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. 

काय म्हणाला सेहवाग?

माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने एक्स अकाउंटवर पोस्ट करून ट्विट केलं की, 'विराट कोहलीने पुन्हा दाखवून दिलं की त्याच्यासाठी धावा करणं एवढं सोपं आहे जेवढं आपल्यासाठी चहा करणं. 52 वं वनडे शतक. कोहली हा रेकॉर्डचा पाठलाग करत नाहीये तर रेकॉर्डस् कोहलीचा पाठलाग करतायत. आज सुद्धा भूक तेवढीच आहे आणि उत्कटता देखील तितकीच आहे. राजा राजाच राहतो!'

मी जास्त तयारी करत नाही : 

विराट कोहलीने 120 बॉलमध्ये 135 धावा केल्या ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला की, 'माझी सर्व तयारी मानसिक आहे. जोपर्यंत माझे शरीर चांगल्या स्थितीत आहे, मी मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण आहे आणि मला चांगले वाटते, ते ठीक आहे. मी सामन्यापूर्वी एक दिवस सुट्टी घेतो. मी 37 वर्षांचा आहे आणि मला रिकव्हरीसाठी वेळ हवा असतो'. विराट पुढे म्हणाला की, 'मला माहित आहे की मी विश्रांती घेऊ शकतो आणि नंतर पुन्हा खेळू शकतो. मी 300 हून अधिक वनडे सामने आणि बरेच क्रिकेट खेळलो आहे. जर तुम्ही खेळाशी संपर्कात असाल आणि नेटमध्ये एक किंवा दोन तास फलंदाजी करू शकत असाल तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही चांगल्या स्थितीत आहात'.

हेही वाचा : 'मी 37 चा आहे आणि मला रिकव्हरीसाठी...' रांचीमध्ये शतक लगावल्यावर काय म्हणाला विराट कोहली?

 

FAQ : 

विराट कोहलीने कोणत्या सामन्यात शतक ठोकले?

विराट कोहलीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात शतक ठोकले.

विराट कोहली किती धावा करून बाद झाला?

विराट कोहली 120 बॉलमध्ये 135 धावा करून बाद झाला.

वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीबद्दल काय म्हटले?

वीरेंद्र सेहवागने म्हटले की, "विराट कोहलीने पुन्हा दाखवून दिलं की त्याच्यासाठी धावा करणं एवढं सोपं आहे जेवढं आपल्यासाठी चहा करणं."

2025-12-01T09:54:32Z