सामन्यादरम्यान क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, खेळताना आला स्ट्रोक; काही तासांतच मृत्यू

Cricketer k lalremruata passed away during match: मिझोरम राज्याला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. मिझोरमचा माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआता यांचे स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने काही तासांतच निधन झाले. क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोरम (सीएएम) ने या दुःखद घटनेची अधिकृत माहिती दिली. अवघ्या ३८ व्या वर्षी एका होतकरू आणि अनुभवी खेळाडूचे असे अकाली जाणे संपूर्ण क्रीडा विश्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे.३८ वर्षीय लालरेमरुआता हे आइझोलजवळील मौबाक येथील रहिवासी होते. 

नक्की काय झालं?

सीएएमच्या माहितीनुसार, गुरुवारी ते सैरंग रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सुआका क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या खालिद मेमोरियल दुसऱ्या विभागाच्या स्क्रिनिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत ते वेंघनुई रेडर्स क्रिकेट क्लब (व्हीआरसीसी)कडून खेळत होते. सामन्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना स्ट्रोक आला. तत्काळ त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली, मात्र काही तासांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोरमने सांगितले की, लालरेमरुआता यांनी आपल्या कारकिर्दीत मिझोरमचे रणजी ट्रॉफीमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते, तसेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यांनी सात सामने खेळले होते. स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांचा मोठा दबदबा होता आणि त्यांनी अनेक नामांकित क्लबकडून खेळत आपल्या खेळाची छाप सोडली होती. ते केवळ एक उत्कृष्ट क्रिकेटपटूच नव्हते, तर तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रेरणास्थानही होते.

सीएएमने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “के. लालरेमरुआता यांच्या आकस्मिक निधनाने मिझोरम क्रिकेटने एक निष्ठावान आणि समर्पित खेळाडू गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या मनापासून संवेदना आहेत. या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देव त्यांच्या कुटुंबाला देवो.”

मिझोरमचे क्रीडा व युवक सेवा मंत्री लालघिंगलोवा हमार यांनीही लालरेमरुआता यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील क्रिकेटच्या विकासात लालरेमरुआता यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

2026-01-09T01:39:30Z