सिडनी, 16 जानेवारी : आजपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुरुवात होत आहे. वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत राफेल नडाल आणि नोवाक जोकोविच यांच्यावर सर्वांची नजर असणार आहे. राफेल नडाल गतविजेता आहे तर जोकोविच ग्रँड स्लॅममध्ये पुनरागमन करणारा आहे. गेल्या वर्षी कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्याला ऑस्ट्रेलियातून माघारी यावं लागलं होतं. याशिवाय सानिया मिर्झाच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.
भारताची दिग्गज टेनिसस्टार सानिया मिर्झाने ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकले आहे. सानिया मिर्झाने गेल्याच आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत सानिया मिर्झाने गेल्या आठवड्यात आपल्या टेनिस कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या होत्या. ३० वर्षांपूर्वी एका सहा वर्षांच्या मुलीने टेनिस शिकण्यासाठी कसा संघर्ष केला याचीही आठवण तिने यात सांगितली.
हेही वाचा : विराटला एकट्याला मालिकावीर पुरस्कार देण्यावर गौतम गंभीरचा आक्षेप
ऑस्ट्रेलियन ओपनमधूनच आपल्या टेनिसमधील कारकिर्दीला सुरुवात कऱणाऱ्या सानियाने याच ग्रँड स्लॅममध्ये निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या कारकिर्दीतली अखेरची स्पर्धा ती पुढच्या महिन्यात दुबईत खेळणार आहे. सानिया मिर्झा तिचं अखेरचं ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी कोर्टवर उतरेल. याआधी तिने २००९ मध्ये मिश्र दुहेरी आणि २०१६ मध्ये महिला दुहेरीत पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलं होतं.
ऑस्ट्रेलियन ओपन ही नव्या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. यातले एकेरीतील सामने आजपासून म्हणजेच १६ जानेवारीपासून सुरू होत आहेत. तर दुहेरीचे सामने २ दिवसांनी १८ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याशिवाय मिश्र दुहेरीतील सामने २१ जानेवारीला सुरू होतील.
2023-01-16T12:03:58Z dg43tfdfdgfd