मुंबई, 17 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी काढून मंगळवारी मोठी घोडचूक झाली. आयसीसीच्या वेबसाइटमधील काही तांत्रिक बिघाडामुळे ऑस्ट्रेलियाचे टेस्ट क्रिकेट मधील अव्वल स्थान भारताने काबीज केले. भारतीय संघ काही क्षणात कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 चा संघ बनला. ऑस्ट्रेलियाच्या 126 गुणांऐवजी, ICC ने भारतीय संघाला115 रेटिंग गुण दिले, ज्यामुळे भारत क्रमांक 1 चा संघ ठरला. तर त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला 126 ऐवजी केवळ 111 गुण दाखवल्याने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. परंतु काही वेळातच आयसीसीला ही चूक लक्षात आली आणि त्यांनी चूक सुधारून ऑस्ट्रेलियाला पुन्हा क्रमांक 1 वर आणले. मात्र या दोन तासात भारतीय संघाच्या फॅन्सने सोशल मीडियावर जल्लोष केला.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ सध्या जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी लवकरच ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रमांक गाठण्याची संधी आहे. लवकरच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तेव्हा या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाला पराभव करण्यात यशस्वी ठरला तर भारत कसोटी क्रिकेट मध्ये आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे प्रथम स्थान बळकावू शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 9 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार असून या मालिकेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरच्या स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. तर दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. तिसरा सामना हा 1 ते 5 मार्च दरम्यान होणार असून चौथा कसोटी सामना हा 9 ते 13 मार्च दरम्यान होणार आहे.
2023-01-17T14:04:27Z dg43tfdfdgfd