कितनी बार दिल जितोगे जड्डू! ज्या बॅटने चेन्नईला विजय मिळवून दिला; तीच बॅट दिली गिफ्ट

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईला पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात यश आले. आयपीएलच्या अंतिम फेरीत या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील सर्वच खेळाडूंनी या सामन्यात शेवटपर्यंत झुंज दिली. पण ही झुंज यशस्वी होणार की नाही हे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने आपली तलवारीसारखी बॅट चालवली आणि मग जे घडलं ते आयपीएलच्या इतिहासात लिहिलं गेलं. जडेजाने २ चेंडूत १० धावांची संघाला गरज असताना गुजरातच्या यशस्वी गोलंदाजाला म्हणजेच मोहित शर्माच्या चेंडूवर शेवटचे दोन्ही चेंडू थेट बाऊंड्रीपार पाठवले आणि एकच चेन्नईच्या नावाचा जयघोष स्टेडियममध्ये दुमदुमला. आता यानंतर जडेजाने पुन्हा एकदम मन जिंकणारं काम केलं आहे.

ही बॅट भेट म्हणून दिली

जडेजाच्या या २ सुपर शॉट्स नंतर चेन्नई संघ आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. संपूर्ण स्टेडियमने एकच जल्लोष केला. जडेजा या विजयाचा हिरो ठरला. या हंगामात चेन्नईच्या ताफ्यात अनेक युवा खेळाडू होते, काही नव्या चेहऱ्यांना आपण खेळतानाही पाहिले. जडेजाने चेन्नईच्या या थरारक विजयानंतर संघासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या अजय मंडल या खेळाडूला जडेजाने खास भेट दिली. जडेजाने ज्या बॅटने चेन्नईला विजयश्री मिळवून दिला. ती बॅट त्याने या युवा खेळाडूला भेट म्हणून दिली. याची माहिती खुद्द अजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे.

अजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या बॅटचा फोटो पोस्ट करत लिहिले की, रवींद्र जडेजाने अंतिम सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूत १० धावा केलेली बॅट भेट म्हणून दिली. त्याबद्दल त्याने जडेजाचे आभार मानले. तसेच चेन्नई फ्रँचायझीचे आभार मानले ज्याने त्याला जडेजासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी दिली.

कोण आहे अजय मंडल

अजय मंडल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळतो. अजय हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा फिरकीपटू आणि डावखुरा फलंदाज आहे. चेन्नईने अजयला या मोसमात २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले पण त्याला या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करता आले नाही. जडेजाने या नव्या दमाच्या युवा खेळाडूला ही बॅट देत त्याला अधिक प्रोत्साहन देत क्रिकेटप्रती प्रेरित केले आहे.

2023-06-01T05:22:02Z dg43tfdfdgfd