₹125 कोटी नाही तर BCCI ने भारतीय महिला टीमला दिली एवढी मोठी रक्कम! ICC च्या बक्षिसापेक्षाही जास्त रक्कम

BCCI Announces Cash Reward For India Women World Cup Winning Team: अंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने आयोजित केलेल्या 2025 च्या महिला विश्वचषकात विजेतेपद भारतीय महिला संघाने नाव कोरलं. नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 52 धावांनी धुव्वा उडवत आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मुलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. भारतीय महिला संघ वर्ल्डकप जिंकल्यास त्यांना 125 कोटींचं बक्षीस दिलं जाईल अशी चर्चा अंतिम सामन्याच्या आधी होती. मात्र आता खरोखरच भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने बक्षिसाची रक्कम किती आहे याची घोषणा केली आहे.

कोणी जाहीर केलं बक्षीस

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सोमवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात भारतीय महिलांच्या संघासाठी बक्षीस जाहीर करण्यात आल्याच्या घोषणेला दुजोरा दिला आहे. रविवारी (2 नोव्हेंबर) डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत एक विशेष निर्णय बीसीसीआयने घेतल्याचं सैकिया यांनी स्पष्ट केलं. 

किती बक्षीस जाहीर केलं?

"बीसीसीआयला ही घोषणा करताना आनंद होत आहे. विशेष म्हणजेच आयसीसीच्या रकमेतून काहीही न घेता, बीसीसीआय स्वतःहून भारतीय संघाला 51 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. ही रक्कम खेळाडू, निवडकर्त्यांना तसेच अमोल मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला दिली जाईल," असे सैकिया यांनी बक्षीस जाहीर करातना म्हणाले. विशेष म्हणजे जेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिलांना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रक्केमपेक्षाही बीसीसीआयने दिलेली ही रक्कम अधिक आहे.

नक्की पाहा हे फोटो >> मॅच जिंकणं अन्.. 'या' खास कारणासाठी रोहित Women's Worldcup Final ला होता हजर! आदल्या रात्रीच...

आयसीसीने जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिलांना किती रक्कम बक्षीस म्हणून दिली?

बीसीसीआयकडून मिळणारे बक्षीस आयसीसीने विजेत्यांना दिलेल्या बक्षीसाच्या रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम असणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेपूर्वी, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला विश्वचषकातील संघांच्या विजेत्या संघांना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रकमेत लक्षणीय वाढ जाहीर केली होती. ज्यामध्ये विजेत्यांना 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 42 कोटी रुपये) मिळतील असं जाहीर करण्यात आलेलं. ही रक्कम आता भारतीय संघाला मिळणार आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला मिळालेल्या 1.32 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा ही रक्कम फार मोठी आहे. 2023 मध्ये अहमदाबादमध्ये भारताला पराभूत करणाऱ्या पुरुष संघाला मिळालेल्या 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा यंदा विजेत्या महिला संघाला देण्यात आलेलं बक्षीस हे मोठं आहे.

नक्की वाचा >> ‘मुलींनी इतिहास रचला, इतक्या...’; भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर विराटही भावूक

तिसऱ्या प्रयत्नात भारताला यश

रविवारी नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताला 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरीत पोहचूनही जेतेपद पटकावण्यात अपयश आलं होतं. मात्र हा अपयशाचा डाग रविवारी भारतीय महिलांनी खोडून काढला.

2025-11-03T05:09:29Z