18 वर्षांपूर्वी खेळाडू असताना भंगलेलं स्वप्न प्रशिक्षक म्हणून केलं पूर्ण

मुंबई, 30 जानेवारी : भारताच्या अंडर 19 महिला संघाने इंग्लंडला हरवून पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला. शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली अंडर 19 संघाने दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. खेळाडूंसाठी हे विजेतेपद तर मोठं आहेच पण त्यांच्याशिवाय ज्यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली त्यांच्यासाठीही खास ठरलं आहे. भारतीय महिला अंडर 19 संघाच्या प्रशिक्षक नूशीन अल खदीर यांचे 18 वर्षांपूर्वीचे स्वप्न अखेर पूर्ण झालं. खेळाडू म्हणून जी कामगिरी करता आली नव्हती ती आता प्रशिक्षक म्हणून केल्याचा आनंद नूशीन अल खादीर यांना आहे.

2005 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदा एखाद्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. समोर ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ होता. तेव्हाही सामना दक्षिण आफ्रिकेतच सेंच्युरियनवर झाला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 216 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. पण मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 46 व्या षटकात 117 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑस्ट्रेलियाने 98 धावांनी विजय मिळवून वर्ल्ड कप जिंकला होता.

हेही वाचा : वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला त्यात चूक कोणाची? सूर्यकुमारने दिली प्रतिक्रिया

भारताला 2005 च्या महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. या संघात नूशीन खदीरसुद्धा होती. तिने 10 षटके गोलंदाजी टाकताना टिच्चून मारा करत फक्त 35 धावा दिल्या होत्या. पण तरीही पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचूनही विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर 2017 मध्येही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला होता. तर 2020 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागंल होतं. पहिल्या वर्ल्ड कप फायनलनंतर 18 वर्षांनी भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं आणि विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं.

अंडर 19 महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नूशीनने म्हटलं की,"वर्ल्ड कपसाठी आम्ही बराच काळ वाट पाहत होतो. पहिल्यांदा आम्ही वर्ल्ड कप जिंकला आणि अंडर 19 च्या मुलींनी हे करून दाखवलं. आपलं भविष्य कसं असेल हेच यातून दिसतं. राष्ट्रगितापासून विजयापर्यंत आमच्या अंगावर शहारे आले होते. आमच्यासाठी हे किती स्पेशल आहे हे मला माहितीय. तरुणांच्या माध्यमातून वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं हे शब्दात सांगणं सोपं नाही."

2023-01-30T05:41:03Z dg43tfdfdgfd