6 सामन्यांमध्ये 5 शतके...! भारतीय क्रिकेटला सापडला नवीन स्टार? कामगिरी आहे दमदार

Aman Yadav hit five centuries in six matches in vijay merchant trophy : सुरु असलेल्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. आसाम अंडर-16 संघाचा कर्णधार अमन यादव यानेही आपली कामगिरी दाखवली आहे. अमनने आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 6 सामन्यांत 5 शतकं आणि 700 पेक्षा जास्त धावा करत अमनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच थक्क केले आहे. अमनची कामगिरी बघून वैभव सूर्यवंशी नंतर आता भारतीय क्रिकेटला आणखी एक भविष्य दमदार खेळाडू मिळाल्याचे चित्र आहे. अमन यादव वयाने लहान असला तरी त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा मोठमोठे विक्रम मोडत आहेत. विजय मर्चंट ट्रॉफीत आसाम अंडर-16 संघाचे नेतृत्व करताना अमनने असा दबदबा निर्माण केला आहे की देशभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

विजय मर्चंट ट्रॉफीत अमनचाच जलवा

अंडर-16 गटातील या प्रतिष्ठित रेड-बॉल स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले आहेत. मात्र अमन यादव इतर सर्व खेळाडूंहून पूर्णपणे वेगळा ठरला आहे. सहा सामन्यांत पाच शतकं झळकावणं ही साधी गोष्ट नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता. अमनने आतापर्यंत आठ डावांत 749 धावा केल्या असून तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

 

मोठ्या संघांविरुद्ध मोठ्या खेळी

अमन यादवने जवळपास प्रत्येक मोठ्या संघाविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बंगालविरुद्ध त्याने शतकी खेळी केली, तर झारखंडविरुद्ध 114 धावांची दमदार इनिंग खेळली. केरळविरुद्ध तर अमन अक्षरशः वर्चस्व गाजवत 173 धावांची अप्रतिम खेळी साकारली, जी या हंगामातील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मुंबईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने नाबाद 166 धावा केल्या, तर छत्तीसगडविरुद्धही 108 धावांवर नाबाद राहिला. या सर्व खेळींमधून हे स्पष्ट होतं की अमन फक्त कमी दर्जाच्या संघांविरुद्धच नव्हे, तर मोठ्या क्रिकेटिंग राज्यांविरुद्धही तितक्याच आत्मविश्वासाने खेळतो.

नेतृत्वातही दिसली परिपक्वता

अमन यादव केवळ धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज नाही, तर तो एक जबाबदार आणि परिपक्व कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आसाम अंडर-16 संघ विजय मर्चंट ट्रॉफीत अजूनपर्यंत अपराजित राहिला आहे. कठीण प्रसंगी स्वतः पुढे येत संघासाठी भक्कम भिंत उभी करणं ही त्याची खासियत आहे. त्यामुळेच संघात आत्मविश्वास आणि सकारात्मकता स्पष्टपणे दिसून येते.

रियान परागकडून भविष्यवाणी

आसाममधूनच भारतीय संघापर्यंत पोहोचलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रियान पराग देखील अमन यादवच्या कामगिरीने प्रभावित झाला आहे. रियानने सोशल मीडियावर अमनच्या खेळी शेअर करत त्याला “भारतीय क्रिकेटचं भविष्य” असं संबोधलं. एखाद्या तरुण खेळाडूसाठी ही खूप मोठी दाद आहे, जेव्हा एक सीनियर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्याच्या कौतुकाचे शब्द बोलतो.

2026-01-08T09:54:30Z