AXAR PATEL CATCH: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट'...अक्षर पटेलने एका हाताने घेतला अप्रतिम झेल, मिशेल मार्शही पाहत बसला, पाहा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक २०२४ च्या ५१ व्या सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कांगारू संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरने आपली विकेट गमावली. मिचेल मार्शच्या रूपाने कांगारू संघाला दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अप्रतिम झेल घेतला. त्याच्या या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने डावातील ९वे षटक कुलदीप यादवकडे सोपवले. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या अक्षर पटेलने एका दमात अप्रतिम झेल घेत सर्वांनाच चकित केले. एकदा मार्शला तो बाद झाला यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मार्श २८ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने भारताला मोठे यश मिळवून दिले. याआधी मार्शला जीवदानाच्या दोन संधी मिळाल्या होत्या. ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांनी आपल्या कॅच सोडल्या होत्या.

दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या उपांत्य फेरीतील आशांना मोठा धक्का बसला आहे. प्रथम खेळताना भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १८१ धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीत कमाल केली. हिटमॅनने अवघ्या ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवने चार षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तर कर्णधार मिचेल मार्शने ३७ धावांची खेळी केली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-24T18:53:55Z dg43tfdfdgfd