BCCI कडून टीम इंडियाला १२५००००००० रुपयांचे बक्षीस जाहीर, जय शाहांनी ट्विटमधून दिली माहिती

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पडत आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी विजेत्या संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये योगदान दिल्याबद्दल खेळाडू आणि सर्व कोचिंग स्टाफचे अभिनंदन केले.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन! जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.' संघाने आपल्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. संघाचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही आणि आज ते दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.

मागील सर्व विश्वचषकाचे रेकॉर्ड मोडीत काढत आयसीसीने यावर्षी सुमारे ११.२५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ९३ कोटी ५१ लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. यामध्ये विजेत्या टीम इंडियाला २.४५ मिलियन डॉलर (जवळपास २०.३६ कोटी रुपये) मिळाले. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेला १.२८ दशलक्ष डॉलर्स (१०.६३ कोटी रुपये) मिळाले आहेत. त्याच वेळी दोन उपांत्य फेरीतील अफगाणिस्तान आणि इंग्लंडला (रु. ६.५४ कोटी) मिळाले आहेत. दरम्यान या विश्वचषकासह रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T16:02:05Z dg43tfdfdgfd