वृत्तसंस्था, लंडन : स्पेनच्या कार्लोस अल्कराझने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशी मात करून रविवारी विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. यासह २१ वर्षांच्या या स्पॅनिश टेनिसपटूने कारकिर्दीतील चौथ्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही अल्कराझने जोकोविचला नमवूनच विजेतेपद मिळवले होते.
जागतिक क्रमवारीत २१ वर्षीय अल्काराझ तिसऱ्या, तर ३७ वर्षीय जोकोविच दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हे दोघे पाच वेळा आमनेसामने आले होते. त्यात जोकोविचने तीन वेळा, तर अल्काराझने दोन वेळा बाजी मारली होती. या वेळी कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता होती. अल्काराझने आक्रमक सुरुवात केली. त्याने पहिला सेट ४१ मिनिटांत ६-२ असा खिशात टाकला. दुसरा सेट जिंकतानाही त्याला फारसे कष्ट पडले नाहीत. तिसऱ्या सेटमध्ये मात्र, अल्काराझने तीन ‘मॅच चॅम्पियनशिप पॉइंट’ गमावले. ५-४ अशी आघाडी त्याने गमावली. मात्र, जोकोविचला त्याने पुनरागमनाची संधी दिली नाही. हा सेट ७-६ (७-४) असा जिंकून त्याने बाजी मारली. ही लढत दोन तास आणि २७ मिनिटे चालली. अल्काराझने जोकोविचची २५वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी हिरावली. जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर आपल्या दुखऱ्या ढोपरावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यामुळे यंदाच्या विम्बल्डनमधील त्याचा सहभागही अनिश्चित होता. मात्र, तसे असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली. अर्थात, युवा अल्काराझच्या चपळाईशी तो बरोबरी करू शकला नाही.
९ - विम्बल्डन जेतेपद राखणारा अल्काराझ नववा टेनिसपटू. याआधी जोकोविचने २०२१ आणि २०२२मध्ये अशी कामगिरी केली होती. त्याआधी फेडरर, सॅम्प्रस, बेकर, मॅकेंन्रो, बोर्ग, जॉन न्यूकॉम्ब आणि रॉड लेव्हर यांनी असा पराक्रम केला होता.
८ - फेडररच्या विक्रमी आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी करण्यात जोकोविचला यंदाही अपयश. त्याच्या नावावर सात विम्बल्डन जेतेपदे
२१ - मे २००३ मध्ये जन्मलेल्या कार्लोस अल्कराझने वयाच्या २१ व्या वर्षी दुसरे विम्बल्डन जेतेपद पटकावले. याआधी बोरिस बेकरने १७ व्या वर्षी विम्बल्डन जिंकून पुढील वर्षी जेतेपद राखलेही होते.
४ - अल्काराझने आतापर्यंत चार वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम धडक मारली असून, या चारही फायनल जिंकण्यात त्याला यश आले आहे. विम्बल्डनआधी यावर्षी त्याने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले, तर २०२२मध्ये अमेरिकन ओपन आणि २०२३मध्ये विम्बल्डनचे जेतेपद पटकावले आहे.
२ - कारकिर्दीतील पहिल्या चारही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करून त्या जिंकण्याचा पराक्रम करणारा अल्कराझ हा रॉजर फेडररनंतरचा दुसराच टेनिसपटू
माझ्या टीमसह मी स्पेनची युरो फुटबॉल स्पर्धेची फायनल नक्की बघणार. कुठे ते आता माहिती नाही; पण बघणार नक्की. टेनिसचे मैदान मारून मी माझे काम पूर्ण केले आहे. तिथे फुटबॉलमध्ये काय होते ते बघायचे. सामना आव्हानात्मक होईल यात शंका नाही.
- कार्लोस अल्काराझ
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-15T02:43:52Z