IPL 2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तुरुंगात गेलेल्या 'या' खेळाडूला मिळाली कोचिंगची जबाबदारी, बनला प्रशिक्षक

Ankeet Chavan IPL Spot Fixing: 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे त्यावेळी क्रिकेटविश्व हादरलं होतं. या प्रकरणात अडकलेल्या खेळाडूंचं करिअर एका क्षणात संपुष्टात आलं. त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव होतं ते म्हणजे राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाण. त्यावेळी त्याला या प्रकरणी तुरुंगाची हवाही खावी लागली होती. आता तोच अंकित चव्हाण पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात परतला आहे . मात्र यावेळी खेळाडू म्हणून नव्हे, तर मुंबईच्या अंडर-14 संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तो येत आहे.

अंकित चव्हाणची 'दुसरी इनिंग' 

स्पॉट फिक्सिंगनंतर बीसीसीआयने अंकितवर आजीवन बंदी घातली होती. पण २०२१ मध्ये ही बंदी कमी करत सात वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात आली. त्यानंतर अंकितने क्लब क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि लेव्हल-१ कोचिंग परीक्षा पास केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) त्याच्या या प्रयत्नांवर विश्वास दाखवत त्याला अंडर-१४ संघाच्या कोचिंगची जबाबदारी दिली आहे.

हे ही वाचा: एजबेस्टनमध्ये झळकली जडेजाची ‘तलवारबाजी’! कारकिर्दीत 23 व्या वेळी केला 'हा' पराक्रम केला, सेलिब्रेशनचा Video Viral

 

काय म्हणाला अंकित? 

"हे माझ्या आयुष्यातलं दुसरं पर्व आहे," असं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अंकित म्हणाला. पुढे तो म्हणाला की "MCAचे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला. कोचिंग ही माझी खरी ओळख आहे. लहान वयात मुलांची नीव मजबूत करणं, हे माझं प्रमुख ध्येय असेल." 

हे ही वाचा: दुर्दैवी! लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनंतर कार अपघातात स्टार खेळाडूचे झाले निधन, भावाचाही झाला मृत्यू

 

नक्की काय झालं होतं ?

२०१३ मध्ये झालेल्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये एस. श्रीसंत, अजीत चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर आरोप झाले होते. बीसीसीआयने त्यांच्यावर तात्काळ आजीवन बंदी घातली होती. मात्र २०१५ मध्ये दिल्लीच्या ट्रायल कोर्टात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्यामुळे सर्व खेळाडूंना दोषमुक्त करण्यात आलं. तरीही बीसीसीआयने बंदी कायम ठेवली होती. २०२१ मध्ये अंकितवरील बंदी सात वर्षांवर आणल्यामुळे २०२३ मध्ये त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची संधी मिळाली.

हे ही वाचा: 60 कोटींची मालमत्ता आणि लाखो रुपयांच्या लग्जरी गाड्या... हरभजन सिंगची एकूण संपत्ती माहित आहे का?

 

खेळाडूपासून प्रशिक्षकापर्यंतचा प्रवास

अंकित चव्हाणने आपल्या कारकिर्दीत १८ फर्स्ट क्लास, २० लिस्ट ए आणि १३ आयपीएल सामने खेळले आहेत. खेळाडू म्हणून त्याने मैदान गाजवलं आणि आता प्रशिक्षक म्हणून युवा खेळाडूंना घडवण्याची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली आहे.

2025-07-03T12:39:39Z