JASPRIT BUMRAH: ते बारीक, अशक्त बाळ! जसप्रीतला जन्मानंतर हातात घेणाऱ्या 'बेबीसीटर'ची काळजाला भिडणारी पोस्ट

अहमदाबाद: भारतानं आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारतानं जेतेपदाला गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत अचूक आणि भेदक मारा करणाऱ्या जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. भारताच्या विजयानंतर बुमराह खूप भावुक झाला होता. भावना व्यक्त करण्यासाठी त्याला शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती. जसप्रीतच्या जन्मानंतर नर्सकडून त्याला हातात घेणाऱ्या, त्याचा सांभाळ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दीपल त्रिवेदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी जसप्रीत आणि त्याच्या कुटुंबासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. बुमराहसोबतचे काही फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत.

'क्रिकेटबद्दल माझं ज्ञान शून्य आहे. मी विराट कोहलीला अनुष्काचा नवरा म्हणून ओळखते. तो डान्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला तो खूप आडतो. पण ही पोस्ट माझ्या हिरोसाठी आहे. डिसेंबर १९९३ मध्ये माझा पगार ८०० रुपयांपेक्षा कमी होता. शेजारीच राहणाऱ्या माझ्या जीवलग मैत्रिणीनं एक दिवस मला सुट्टी घेण्यास सांगितलं. तिची प्रसुती होणार होती. तेव्हा मी २२-२३ वर्षांची असेन. माझा जवळपास संपूर्ण दिवस अहमदाबादच्या पालडी परिसरातील रुग्णालयात जायचा. माझी मैत्रीण दलजितची प्रसुती झाली. नर्सनं आमच्या नावाचा पुकारा केला. काही वेळात तिनं एक बाळ आणून माझ्या हातात दिलं. नवजात बाळाला मी पहिल्यांदाच स्पर्श करत होते. ते बाळ काहीसं कमकुवत होतं. ते हसण्याचा प्रयत्न करत होतं. पण त्याला जमत नव्हतं. तो मुलगा असल्याचं नर्सनं सांगितलं. तो बारीक आणि अशक्त होता. माझी मैत्रीण खूप खूष होती. तिला एक मोठी मुलगी होती. तिचं नाव जुहिका. मी जुहिकासाठी मानलेली आईच होते,' असं दीपल यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

'ही बॉलिवूडची फिल्म आहे. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणलाल पटेल यांचं निधन झालं. पुढच्या दोन महिन्यात मी राजकीय बातमीदारी करु लागले. माझा पगारही वाढला. आम्ही अगदी शेजारी राहायचो. माझ्याकडे फोन, फ्रीज इतकंच काय साधा बेडही नव्हता. आमच्या घरांमध्ये केवळ एका भिंतीचं अंतर होतं. तिचं घर माझ्यासाठी स्वर्ग होता. पण दुर्दैवानं माझ्या मैत्रिणीच्या पतीचं अकाली निधन झालं. त्या संपूर्ण महिन्यात मी तिच्या दोन लेकरांची देखभाल केली. तिच्या मुलाला अभ्यासात कधीच रस नव्हता. तो एका साध्या प्लास्टिक बॉलनं खेळत राहायचा. त्यांचं संगोपन करताना मी कधीकधी त्यांची बिस्किटंही खायचे. कारण भूक खूप लागायची,' अशा शब्दांत दीपल यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

'आम्ही उपाशी राहिलो, आम्ही रडलो, आम्ही लढत राहिलो. आयुष्यासोबत संघर्ष सुरु होता. मी जुहिकासाठी मानलेली आई होते. तिनं मला आशेचा किरण दाखवला. तिच्या हसण्यानं, घट्ट मिठीनं मला जगण्याचं बळ दिलं. पण त्या मुलाची परिस्थिती बिकट होती. आम्हाला दुधाची पिशवीही परवडत नव्हती. तो मोठा होत होता. आमचा रोजचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होता. त्याची आई दिवसातले १८ तास काम करायची. माझी पगारवाढ झाल्यावर एकदा मी वेस्टसाईडला कुर्ता खरेदीसाठी गेले होते. ते दुकान अतिशय पॉश होतं. त्यावेळी मला तो तिथे त्याच्या आईसोबत दिसला. ८ वर्षांचा होता तो. त्याला विंडचीटर हवं होतं. तेच मी त्याला दिलेलं एकमेव गिफ्ट. मी दिवाळी, ख्रिसमस आणि माझा वाढदिवस नव्या कुर्त्याशिवाय घालवला. पण त्याला विंडचीटर दिल्यानं मला समाधान दिलं,' अशी आठवण दीपल यांनी पोस्टमध्ये सांगितली आहे.

'तो अतिशय लाजाळू होतं. तो आता दिग्गज म्हणून नावारुपाला आला आहे. यात भर म्हणून गेल्याच रात्री त्यानं आपल्याला क्रिकेट वर्ल्डकप मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटायला हवा आणि त्याच्याकडून शिकायला हवं. तो आताही तितकाच नम्र आहे, जितका तो ८ वर्षांचा असताना होता. त्याचं नाव जसप्रीत बुमराह. त्याच्या आईच्या आग्रहावरुन मी त्याचा एक सामना पाहण्याचा प्रयत्न केला. पण मला क्रिकेटबद्दल काहीच समजत नाही. कदाचित अंगद फुटबॉल खेळेल, तेव्हा मी त्याला पाहीन,' असं दीपल यांनी म्हटलं आहे.

'मी इतकी मोठी पोस्ट लिहिली आहे कारण मला तुम्हाला सांगायचंय की कधीही लढणं सोडू नका. कारण देव कधीही आपली साथ सोडत नाही. जसप्रीतला जन्मानंतर हातात घेणारी मी होते याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. तो क्षण मला आयुष्यात लढण्याचं बळ देतो. परिस्थितीशी दोन हात घडवणारी अशी मुलं घडवण्यात त्याच्या आईचाही मोठा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी जसप्रीतची पत्नी संजनानं आम्हाला जेवणासाठी बोलावलं. तेव्हाही तोच नम्रपणा, ऋजुता दिसली. माझं बाळ असलेल्या जसप्रीतकडे आता त्याचं स्वत:चं बाळ आहे. अंगद जसप्रीतपेक्षा हँडसम आहे!,' अशा शब्दांत दीपल यांनी बुमराह कुटुंबाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T04:04:07Z dg43tfdfdgfd