MS DHONI KNEE SURGERY: धोनीच्या गुडघ्याची सर्जरी यशस्वी; पाहा कुठे आणि कुणी केलं ऑपरेशन

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स संघाला पराभावाचा धक्का दिला. यासह सीएसके संघाच्या नावावर पाचवी आयपीएल ट्रॉफी झाली. एमएस धोनी याच्या नेतृत्वात सीएसकेने ५ ट्रॉफ्या आपल्या नावावर केल्या आहेत. यासह त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ५ वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

हा हंगाम धोनीसाठी खूपच खास राहिला आहे. त्याला प्रत्येक विरोधी संघाच्या मैदानावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. मात्र, यादरम्यान तो गुडघ्याच्या दुखापतीने चिंताग्रस्तही दिसला. अशात आता धोनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. धोनीवर मुंबईला एका मोठ्या रुग्णालयात गुडघ्याची सर्जरी पार पडली आहे.

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्था येथे एमएस धोनी याच्यावर उपचार झाले आहेत. आज गुरुवारी प्रख्यात डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी धोनीच्या गुडघ्याची सर्जरी केली. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी बुधवारी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. आज गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची यशस्वी सर्जरी झाली आहे.

मुंबईला जाण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाशी आपली दुखापत आणि सर्जरीबद्दल विचारविनिमय केला. त्यांनतर फ्रँचायझीने संघाचे फिजीशियन डॉ. मधू यांना धोनीसोबत मुंबईला पाठवले होते. विशेष बाब म्हणजे, डॉ. दिनशॉ परडीवाला यांनीच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यावरही उपचार केले होते. मागील वर्षी पंत रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर मुंबईच्या याच रुग्णालयात उपचार झाले होते.

2023-06-01T14:21:43Z dg43tfdfdgfd