SMRITI MANDHANA : स्मृती मानधनाचा ट्रॉफीसह फोटो, होणाऱ्या नवऱ्याने भारतीयांची मनं जिंकली, 5 शब्दात प्रेम आणि अभिमानही व्यक्त

नवी मुंबई : भारताने महिलांच्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत विजेतेपद पटकावले. भारताने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला. भारताने इतिहासात पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कप उंचावला. या विजयाचे शिल्पकार कर्णधार हरमनप्रीत कौरसोबतच संघातील प्रत्येक खेळाडू होती.

सांगलीची मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने ५८ चेंडूंत आठ चौकारांसह ४५ धावा केल्या. स्मृती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे हे विश्वचषक विजेतेपद तिच्यासाठी सर्वार्थाने विशेष ठरले. संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सांगलीतच दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. स्मृती-पलाश यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

स्मृतीने वर्ल्डकप उंचावल्यानंतर तिचा होणारा नवरा पलाश मुच्छल याने सोशल मीडियावरुन भावना व्यक्त केल्या आहेत. पलाशने इन्स्टाग्रामवर स्मृती आणि विश्वचषकाचा फोटो शेअर केला आहे. 'सबसे आगे है हम हिंदुस्तानी' या फक्त पाच शब्दात त्याने स्मृतीसह भारतीय महिला संघाविषयीही अभिमान व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत पलाशने काही वर्षांपूर्वी हातावर काढलेला टॅटूही दिसत आहे. 'SM18' अर्थात स्मृती मानधना आणि तिचा जर्सी नंबर 18 हातावर कायमस्वरुपी गोंदवून घेत पलाशने आपल्या प्रेमाची निशाणी दाखवली आहे.

पलाश मुच्छल हा प्रख्यात गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे. पलाश आणि स्मृती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहेत. दोघांनीही यावर कित्येक भाष्य करणं टाळलेलं होतं, मात्र सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांची जोडी कधीच जुळवली होती.

दरम्यान, शेफालीने स्मृती मानधनासह पॉवरप्लेमध्ये ६४ धावा फटकावल्या. तिला ५६ धावांवर असताना ॲनेक बॉश हिने जीवदान दिले अन् स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. या कौतुकाने शेफालीच्या आत्मविश्वासाला खतपाणी घातले. तिने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवून दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणले; तसेच स्मृतीसह १०४ धावांची सलामी दिली.

2025-11-03T04:23:21Z