Sourav Ganguly Wife Donna on Trolling: भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सौरव गांगुली यांची पत्नी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध ओडिशी नृत्यांगना डोना गांगुली सोशल मीडियावरील अपमानास्पद वर्तनाला कंटाळून अखेर पोलिसांच्या दारात दाखल झाल्या आहेत. सतत सुरू असलेले अश्लील, अभद्र आणि बॉडी-शेमिंग करणारे कमेंट्स काढून टाकावेत आणि यामागील व्यक्तींची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
अलीकडेच डोना गांगुली यांनी कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये खूप सुंदर नृत्य प्रस्तुती दिली. त्यांच्या या परफॉर्मन्सनंतर काही सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या फेसबुक पेजवरून अनुचित आणि अवमानकारक टिप्पणी करायला सुरुवात केली. काही कमेंट्स इतक्या घाणेरड्या होत्या की त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला.
तक्रारीत त्यांनी नमूद केले की, गेल्या 45 वर्षांपासून त्या जगभर भारतीय नृत्यकलेचा प्रसार करीत आहेत. तरीदेखील त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अपमानास्पद पद्धतीने टीका केली जात आहे, हे दुःखद आणि त्रासदायक आहे.
या संपूर्ण प्रकाराशी संबंधित फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट तसेच त्याच्यावर दिसणारा एक मोबाइल नंबर त्यांनी पोलीसांकडे जमा केला आहे. पोलीसांनी तत्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करत सायबर टीमलाही तपासात सहभागी केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कडक कारवाई होऊ शकते.
डोना गांगुलींसाठी हा प्रसंग नवीन नाही. याच वर्षी त्यांनी कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिला यूट्यूबरविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या यूट्यूबरवर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बदनाम करणारी सामग्री सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप होता.
याशिवाय, 2021 मध्येही त्यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करून त्यांच्या, सौरव गांगुलींच्या आणि त्यांच्या मुलीच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याची घटना घडली होती. त्या वेळी त्यांनी ते पेज चालवणाऱ्यांविरोधात जोरदार आक्षेप घेतला होता.
डोना गांगुली म्हणतात की, कलेचा आदर राखण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्यांच्या मते, सोशल मीडियावरून बदनामी करणे, घाणेरडे आरोप करणे किंवा एखाद्या कलाकाराचा मानसिक छळ करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी यापुढे अशा वर्तनावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
2025-11-29T02:39:30Z