T20 WORLD CUP 2026 संदर्भात बांगलादेश क्रिकेट बोर्डची ड्रामेबाजी, ICC ला पुन्हा लिहिले पत्र

 BCB send 2nd letter ICC Regarding T20 world cup 2026 venue: टी-20  विश्वचषक 2026 काही महिन्यावरच येऊन ठेपला आहे. गेल्या काही दिवसापासून बांगलादेश आणि भारत यांच्यात चांगले संबंध नाहीयेत. विश्वचषक  जवळ येत असताना बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) पुन्हा एकदा बचावात्मक भूमिकेत दिसत आहे. स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित सुरक्षेच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत बीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) कडे पुन्हा एक औपचारिक पत्र पाठवले आहे. या पत्रात भारतात होणाऱ्या सामन्यांऐवजी दुसरे   पर्यायी यजमान स्थळ म्हणून विचारात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोणते पर्यायी स्थळ आहे BCB ची मागणी?

या पत्रात भारतात होणाऱ्या सामन्यांऐवजी श्रीलंकेला पर्यायी यजमान स्थळ म्हणून विचारात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार असून बांगलादेश संघाचे एकूण चार सामने नियोजित आहेत. यापैकी तीन सामने कोलकात्यात तर एक सामना मुंबईत होणार आहे. मात्र, बीसीबीने भारत दौऱ्यास स्पष्ट नकार दिला असून, अलीकडेच वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला बीसीसीआयच्या निर्देशानुसार आयपीएलमधून मुक्त करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अधिक महत्त्वाचा झाला आहे.

बीसीसीआयने हा निर्णय सध्याच्या काही घडामोडी आणि परिस्थितीचा हवाला देत योग्य ठरवला होता. दरम्यान, क्रिकेट बोर्डशी संबंधित एका वरिष्ठ सूत्राने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बीसीबीने आयसीसीला पुन्हा पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने बांगलादेश बोर्डकडून सुरक्षेच्या चिंतांबाबत सविस्तर माहिती मागितली होती, ती माहिती या पत्राद्वारे देण्यात आल्याचेही समजते.

पत्रात नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आलेत?

पण, या पत्रात नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत, याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. बीसीबी आणि आयसीसी यांच्यात बांगलादेशच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या सातत्यपूर्ण चर्चांच्या दरम्यानच हा नवा घडामोडीचा टप्पा समोर आला आहे. आयसीसीने अद्याप या प्रकरणावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नसून, ढाका स्थित बोर्डने व्यक्त केलेल्या सुरक्षाविषयक चिंतांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याबाबत अधिक स्पष्टता हवी असल्याचे संकेत दिले आहेत.

या संपूर्ण मुद्द्यावर बीसीबीच्या अंतर्गत वर्तुळातही मतभेद असल्याचे मानले जात आहे. बोर्डमधील एक गट आसिफ नजरुल यांच्या कठोर भूमिकेला पाठिंबा देत आहे, तर दुसरा गट आयसीसी आणि भारतीय क्रिकेट अधिकाऱ्यांशी संवाद सुरू ठेवण्याच्या बाजूने आहे. हा गट भारतात बांगलादेश संघाच्या उपस्थितीदरम्यान मजबूत, विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर भर देत आहे.

एकूणच, टी-20 विश्वचषकाच्या आयोजनाआधी हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, आयसीसी या मुद्द्यावर पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

2026-01-09T03:09:30Z