नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जाएंट्स या आयपीएलमधील लढतीदरम्यान एकमेकांना भिडले. या दोघांच्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जितकी रक्कम लोक आयुष्यभर कमाई करुनही मिळवू शकत नाहीत, त्याहून अधिक रक्कम विराट कोहलीने एका झटक्यात गमावली आहे. आरसीबीचा प्रमुख फलंदाज कोहली आणि लखनौ संघाचा मेंटॉर गंभीर यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या मॅचनंतर शाब्दिक चकमक झाली. त्याआधी लखनौविरुद्धच्या सामन्यात गंभीर आणि नवीन हे दोघं एकमेकांना भिडल्यानंतर आता कोहलीवर एक कोटीहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. या वादानंतर कोहलीसह गंभीरवरही मोठा दंड ठोठावण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी अर्थात १.७ कोटी रुपये, तर गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी २५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर या वादात असलेला आणखी एक खेळाडू नवीन-उल-हक याला ५० टक्के मॅच फी १.७९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हल या तिघांना मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला. हे दंडाचे पैसे त्या खेळाडूंच्या फ्रेंचाइजींना भरावे लागणार आहेत. कोहली आणि गंभीरवर आयपीएलच्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याबद्दल मंगळवारी मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला.
मॅच संपल्यानंतरही विराट - गंभीर - नवीन-उल-हलमध्ये धुसफूस
मॅच संपल्यानंतर ज्यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते, त्यावेळी लखनौचा गोलंदाज नवीन आणि कोहली यांची बाचाबाची सुरू झाली. हे पाहून आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं.
त्यानंतर गंभीरने कोहलीसोबत बोलत असलेल्या मायर्सला कोहलीशी बोलण्यापासून रोखलं. त्यानंतर लगेच गंभीर कोहलीकडे जाताना दिसतो. त्यावेळी लखनौच्या जखमी झालेल्या केएल राहुलसह इतर खेळाडूंनी त्याला रोखलं. तरीही कोहली आणि गंभीरमध्ये बाचाबाची सुरू होती. मैदानातील गंभीर, कोहली आणि नवीनची ही वागणूक चुकीची असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
2023-05-03T08:10:52Z dg43tfdfdgfd