WTC फायनल IND VS AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सुरुवात ७ जूनपासून होत आहे. दोन्ही संघ लंडनच्या द ओव्हल मैदानावर जेतेपदासाठी लढतील. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. गेल्यावेळी म्हणजे २०२१ मध्ये फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता टीम इंडियाचा प्रयत्न असेल की दुसऱ्यांदा आलेली संधी गमवू नये.

पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. तेव्हा पावसामुळे मॅच राखीव दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी झाली होती. इंग्लंडचे हवामान लहरी असल्याने कधी पावसाला सुरुवात होईल याचा भरवसा नाही. अशात यावेळी देखील मॅच इंग्लंडमध्ये होत आहे आणि म्हणूनच चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गेल्या वेळी प्रमाणे काही झाले किंवा मॅच ड्रॉ झाली तर चॅम्पियन कोण होणार.

गेल्या काही वर्षात कसोटी सामन्यांचे निकाल लागत असेल तरी ड्रॉ मॅचची संख्या कमी नाही. अशाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोणत्याही कारणामुळे ड्रॉ झाली तर कोणता संघ विजय होईल. याबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो? नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलची मॅच झाली नसती तर साखळी फेरीनंतर गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळाले असते. असाच नियम WTCसाठी देखील आहे का? जाणून घेऊयात...

आयसीसीच्या नियमानुसार जर फायनल मॅच ड्रॉ झाली तर कोणताही एक नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना संयुक्त विजेता म्हणून जाहीर केले जाईल. अर्थात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघांचीही इच्छा नसेल की त्यांना संयुक्त विजेतेपद मिळावे. दोघांचा असाच प्रयत्न असेल की चॅम्पियनशिप मिळवावी.

आयपीएलचा १६वा हंगाम खेळल्यानंतर भारतीय खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत. खेळाडूंनी सराव देखील सुरु केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान असेल ते संघ निवडीचे होय. गेल्या वेळी फायनल मॅचमध्ये भारताने दोन फिरकीपटू खेळवले होते आणि संघाचा पराभव झाला होता. यावेळी रोहित शर्मा काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

2023-06-03T10:22:27Z dg43tfdfdgfd