पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India World Record : रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाचा हा घरच्या मैदानावरचा सलग 18वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. अशी कामगिरी आजपर्यंत कोणत्याही संघाला करता आलेली नाही.
भारताने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची चार सामन्यांची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली होती. पण त्यानंतर टीम इंडियाच्या विजयीरथाची घोडदौड सुसाट झालेली आहे. याची सुरुवात 2013 मध्ये झाली. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव केला होता. त्यानंतर पुढील 12 वर्षांपासून टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात खेळल्या गेलेल्या 51 कसोटी सामन्यांमध्ये भारताने केवळ 4 सामने गमावले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाने 2012 पासून घरच्या मैदानावर 40 कसोटी सामने जिंकले आहेत. या कालावधीत 7 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने एक मोठा विक्रम केला आहे. मायदेशात सर्वाधिक 18 वेळा कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे, ज्याने मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकण्याचा विक्रम केला आहे. कांगारूंनी पहिल्यांदा 1994 ते नोव्हेंबर 2000 पर्यंत 10 कसोटी मालिका जिंकल्या, तर दुसऱ्यांदा 2004 ते नोव्हेंबर 2008 च्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली होती.
भारत (2013-2024) : 18* मालिका विजय
ऑस्ट्रेलिया (1994-2000) : 10 मालिका विजय
ऑस्ट्रेलिया (2004-2008) : 10 मालिका विजय
वेस्ट इंडीज (1976-1986) : 8 मालिका विजय
न्यूजीलंड (2017-2020) : 8 मालिका विजय
टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकून आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. टीम इंडिया आता सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा चौथा संघ बनला आहे. या बाबतीत भारतीय संघाने द. आफ्रिकेला मागे टाकले आहे. सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.
ऑस्ट्रेलिया : 414 कसोटी विजय
इंग्लड : 397 कसोटी विजय
वेस्टइंडीज : 183 कसोटी विजय
भारत : 180 कसोटी विजय
द. आफ्रिका : 179 कसोटी विजय