भारताकडे ओपनर्सची कमतरता? कोण असेल अभिषेक शर्माचा जोडीदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN T20 Series : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी शनिवारी (28 सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर हार्दिक पंड्याही संघात आहे. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तर वरुण चक्रवर्तीही तीन वर्षांनंतर टी-20 संघात परतला आहे. भारत-बांगलादेश टी-20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

शुभमन गिल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल या खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग असल्याचे निवडकर्त्यांनी सांगितले आहे. हे खेळाडू सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. त्यानंतर या खेळाडूंना 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी व्हायचे आहे.

अभिषेक शर्मासोबत कोण ओपनिंग करणार?

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये केवळ अभिषेक शर्माची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता टी-20 मालिकेत त्याच्यासोबत सलामीला कोण येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल संघात नसल्यामुळे संजू सॅमसनला अभिषेकसोबत सलामी द्यावी लागू शकते. संजूने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ पाच सामन्यांमध्ये सलामी दिली आहे, ज्यामध्ये त्याने 77 धावा केल्या आहेत.

दुसरा पर्याय डावखुरा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आहे. सुंदरने अद्याप टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सलामी दिली नसली, मात्र तो एकदिवसीय सामन्यांमध्ये एकदा सलामीला आला होता. गेल्या वर्षी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याला ही संधी मिळाली होती. त्यावेळी सुंदरने सलामीवीर म्हणून 18 धावांची खेळी खेळली होती.

मात्र, टी-20 मालिकेत सलामीवीर म्हणून वॉशिंग्टन सुंदरला खेळवले जाण्याची शक्यता कमी आहे. अभिषेक शर्माप्रमाणे सुंदरही डाव्या हाताने फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत डावे-उजवे कॉम्बिनेशन शक्य होणार नाही. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सलामी दिल्यास हे कॉम्बिनेशन प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देण्यास उपयुक्त ठरेल.

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना : 6 ऑक्टोबर (ग्वाल्हेर), संध्याकाळी ७ वाजता

दुसरा टी-20 सामना : 9 ऑक्टोबर (दिल्ली), संध्याकाळी ७ वाजता

तिसरा टी-20 सामना : 12 ऑक्टोबर (हैदराबाद), संध्याकाळी ७ वाजता

2024-09-29T07:11:52Z dg43tfdfdgfd