इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधीच टीम इंडियाला झटका; स्टार खेळाडूने घेतली माघार

नवी दिल्ली: इंग्लंडचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. या मालिकेची सुरूवात २५ जानेवारीपासून होत आहे. मालिका सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने वैयक्तीक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे. या संदर्भात विराटचे कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. देशाकडून खेळणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. पण काही वैयक्तीक महत्त्वाच्या कारणामुळे पहिल्या दोन कसोटीसाठी आपण उपलब्ध असणार नाही असे विराटने सांगितले. बीसीसीआयने विराटची ही विनंती मान्य केली आहे. त्याच बरोबर माध्यमे आणि चाहच्यांनी विराट खासगी आयुष्यातील गोपनीयतेचा आदर करावा आणि कोणत्याही गोष्टीचा अंदाज लावू नये अशी विनंती बीसीसीआयने केली आहे.

पहिल्या दोन कसोटीसाठी विराट उपलब्ध नसल्याने आता निवड समिती त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड करतील असे देखील बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २५ जानेवारी रोजी हैदराबाद येथून सुरू होत आहे. दुसरी कसोटी २ ते ६ फेब्रुवारी विशाखापट्णम, तिसरी कोसटी १५ ते १९ फेब्रुवारी राजकोट, चौथी कसोटी २३ ते २७ फेब्रुवारी रांची तर पाचवी आणि अखेरची कसोटी ७ ते ११ मार्च दरम्यान धरमशाला येथे होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. WTCच्या गुणतक्त्यात टीम इंडिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी ५४.१६ इतकी आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची ६१.११ इतकी आहे. पहिल्या दोन चॅम्पियनशिपच्या सत्रात भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळा टीम इंडियाचा पराभव झाला होता. पहिल्या सत्रात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

2024-01-22T10:05:57Z dg43tfdfdgfd