टीम इंडियाची ताकद आणखी वाढली! सेमी फायनलआधी दोघांनी रोहितची चिंता मिटवली; लंकेची दाणादाण

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग सहा सामने जिंकणारा भारतीय संघ उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघ वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध सातवा सामना खेळत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं ५० षटकांत ८ बाद ३५७ धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था ११ षटकांनंतर ६ बाद २१ अशी केविलवाणी झाली आहे.

कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीनं १८९ धावांची भागिदारी रचली. गिल ९२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर लगेचच विराट कोहलीदेखील माघारी परतला. त्यानं ८८ धावा केल्या. गिल बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरनं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावणाऱ्या अय्यरवर संघ व्यवस्थापनानं विश्वास दाखवला. अय्यरनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कोहली, गिल बाद झाल्यानंतरही त्यानं धावगती कमी होऊ दिली नाही. अय्यरनं ५६ चेंडूंमध्ये ८२ धावा चोपल्या. त्यात ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. अय्यरला सूर गवसल्यानं कर्णधार रोहित शर्माची चिंता दूर झाली आहे.

आशिया कपच्या अंतिम फेरीत लंकेविरुद्ध सहा विकेट टिपणाऱ्या मोहम्मद सिराजला विश्वचषक स्पर्धेत फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६.३ षटकांत २६ धावा देऊन एका फलंदाजाला बाद करणारा सिराज अफगाणिस्तानविरुद्ध महागडा ठरला. त्याच्या ९ षटकांमध्ये ७६ धावा चोपण्यात आल्या. या सामन्यात त्याच्या विकेट्सची पाटी कोरी राहिली. पाकिस्तानविरुद्ध ८ षटकांत ५० धावा देऊन २ फलंदाजांना माघारी धाडलं.

बांग्लादेशविरुद्ध सिराजनं १० षटकांत ६० धावांमध्ये २ गडी टिपले. न्यूझीलंडविरुद्ध सिराजनं १० षटकांमध्ये ४५ धावांमध्ये एका फलंदाजाला माघारी धाडलं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहनं टिच्चून गोलंदाजी केली. शमीनं ३, तर बुमराहला ३ विकेट्स मिळाल्या. पण सिराजला एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही. पण श्रीलंकेविरुद्ध सिराज चमकला आहे. सिराजनं लंकेच्या ३ फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. विशेष म्हणजे यामध्ये सलामीवीर आणि तिसऱ्या, चौथ्या नंबरवरील फलंदाजांचा समावेश आहे. सिराजनं १५ धावांत ३ गडी बाद केले.

2023-11-02T14:55:24Z dg43tfdfdgfd