टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी का निवडली? रोहित शर्माने सांगितलं मोठं कारण

कोलकाता: विश्वचषक २०२३ मधील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या दोन्ही संघांमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये मोठा सामना आज ५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ पॉईंट्स टेबलमध्ये टॉपला राहण्यासाठी विजय मिळतील. भारतीय संघ सध्या १४ गुणांसह आणि एकही सामना न गमावता पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह आणि एका पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांमधील आज जो संघ सामना जिंकेल तो पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर जाईल. यंदाच्या विश्वचशकतील जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या दोन संघातील या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन कशी आहे; जाणून घ्या.

भारतीय संघ सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे भारतीय संघात कोणते बदल होणार का आणि झाल्यास कोणाला संधी मिळणार आणि कोणाला विश्रांती देणार याकडे सर्वांच्या नजर लागल्या होत्या. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे विश्वचषक संघातून बाहेर पडला आहे, त्यामुळे आता संघात नेमके कोणते बदल होणार, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याची नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा टॉसनंतर नेमकं काय म्हणाला आणि भारताचा संघ कसा आहे, पाहूया.

रोहित शर्मा काय म्हणाला; "आम्ही प्रथम फलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसते, खेळपट्टीशी तसा फारसा संबंध नाही, आम्हाला स्वतःला आव्हान द्यायचे होते. हा एक चांगला सामना असेल, दोन संघ ज्यांनी सातत्यपूर्ण क्रिकेट खेळले आहे आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, हा सामना जिंकून शीर्षस्थानी जाणे चांगले असेल. मला इथे खेळायला आवडते, फक्त मीच नाही तर संपूर्ण संघ या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही एकच संघ खेळत आहोत, आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत त्यात आम्हाला काहीही बदलण्याची गरज नाही." अशारितीने या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

2023-11-05T08:29:52Z dg43tfdfdgfd