धोनीविरोधात एकेकाळच्या मित्रानंच दाखल केला अब्रनुकसानीचा खटला; १५ कोटींचं प्रकरण नेमकं काय?

दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. धोनीचा एकेकाळचा मित्र आणि माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी धोनी विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखव केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १८ जानेवारीला होईल. न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्यासमोर खटल्याची सुनावणी होईल.

महेंद्रसिंह धोनीनं काही दिवसांपूर्वीच अरका स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या मिहिर आणि सौम्या यांच्याविरोधात रांचीच्या सिव्हिल कोर्टात गुन्हेगारी खटला दाखल केला. आपलं १५ कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा दावा त्यात धोनीनं केला होता. यानंतर धोनीच्या माजी बिझनेस पार्टनरनं अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. आपल्या प्रतिष्ठेचं होणारं नुकसान रोखण्याची मागणी मिहिर दिवाकर आणि त्याच्या पत्नीनं केली आहे.

अब्रुनुकसानीच्या खटल्यात नेमकं काय?

२०१७ च्या कराराच्या कथित उल्लंघनाप्रकरणी धोनी आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांकडून होणारे अब्रुनुकसानीचे आरोप रोखण्याचे आदेश देण्याची मागणी दिवाकर आणि दास यांनी केली. हा करार धोनीचा मित्र दिवाकर आणि दास यांची कंपनी अरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्यात झाला. धोनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांनी दिवाकर आणि दास यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. त्यामुळे त्यांची मानहानी झाली, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

याआधी धोनीनं त्याच्या दोन जुन्या बिझेनस पार्टनरवर फसवणुकीचा आरोप केला होता. मला क्रिकेट अकादमी उघडण्याचं कंत्राट मिळणार होतं. पण मला ते देण्यात आलं नाही. माझी जवळपास १६ कोटी रुपयांना फसवणूक झाली, असं धोनीनं तक्रारीत म्हटलं. अरका स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या दोन संचालकांविरोधात धोनीनं रांचीच्या न्यायालयात खटला दाखल केला.

2024-01-17T02:28:28Z dg43tfdfdgfd