'प्रत्येक संघ मालक..'; मुंबईने रोहितऐवजी हार्दिकला कॅप्टन केल्यासंदर्भात युवराज स्पष्टच बोलला

Yuvraj Singh No Nonsense Take On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगच्या 2024 च्या पर्वाआधी केलेला खांदेपालट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 2 वर्षांपूर्वी संघातून बाहेर पडलेल्या हार्दिक पंड्याला पुन्हा संघात स्थान देत त्याला थेट कर्णधार करण्यात आलं आहे. रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटविश्वात या नेतृत्वबदलाची तुफान चर्चा असून बऱ्याच जणांनी हा निर्णय संघासाठी मारक ठरेल अशी भिती व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे संघात फूट पडली असून रोहित शर्मा गट आणि हार्दिक पंड्या गट पडल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. हार्दिककडे नेतृत्व सोपवल्याने संघाचं भाविष्य फारसं उज्वल नसेल अशी भितीही रोहितच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. याचसंदर्भात बोलताना भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगने आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

युवराज काय म्हणाला?

युवराज सिंगला रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा सोपवण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना युवराज सिंगने अशाप्रकारे नेतृत्व बदल होतो तेव्हा संघ मालक दिर्घकालीन विचार करत असतात, असं म्हटलं. मात्र त्याचवेळी रोहित शर्मासारख्या अनुभवी व्यक्तीचा अनुभव तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही, असंही सांगायला युवराज विसरला नाही.

मी सुद्धा याला सामोरे गेलो आहे

"फ्रेंचायजींच्या (संघ मालकांच्या) माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेटमध्ये तुमचं वय वाढत जातं तसं तुम्हाला कठीण निर्यणांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक फ्रेंचायजी (संघ मालक) तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांच्यावर त्यांनी भरपूर पैसा खर्च केला आहे. हीच सर्वाधिक चिंतेची बाब असते. मी सुद्धा या परिस्थितीला समोरे गेलो आहे. मात्र असं असलं तरी अनुभवाला रिप्लेस करता येत नाही. रोहितकडे फार अनुभव असून त्याने तसे निकालही दिले आहेत. मात्र फ्रेंचायजींना दिर्घकालीन विचार करावा लागतो," असं युवराज 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

मुंबईची चर्चा

इंडियन प्रिमिअर लीग 2024 ची सुरुवात यंदाच्या वर्षी 18 मार्चपासून होणार आहे. या पर्वाच्या आधी झालेला लिलाव, प्लेअर एक्सचेंज यासारख्या गोष्टी चर्चेत आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सने घेतलेले काही निर्णय चाहत्यांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. मुंबईच्या संघातील या घडामोडींनी चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच संघात अंतर्गत धुसपूस असल्याची चर्चा आहे. हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. या निर्णयानंतर अनेक खेळाडू अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरुन व्यक्त झाले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्याकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र सातत्याने तो जायबंदी होत असल्याने त्याच्या नेतृत्वाबद्दल शंकाही उपस्थित केली जात आहे.

2024-01-18T10:53:40Z dg43tfdfdgfd