भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आऱ अश्विनने इंग्लंडविरोधात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहची तोंडभरुन स्तुती केली आहे. या सामन्यात 'बूमबॉल' हा खरा 'शो स्टिलर' होता असं तो म्हणाला आहे. हैदराबादमधील पहिल्या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी भारताचा पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सामन्यात बुमराहने आपल्या गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना सैरभर केलं. भारताने 106 धावांनी विशाखाटपट्टणमधील दुसऱा सामना जिंकला. आपल्या जबरदस्त कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला. पहिल्या डावात त्याने 6 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. यासह बुमरहाने आऱ अश्विनला मागे टाकत कसोटीमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना बुमराहचं कौतुक केलं आहे. त्याने अत्यंत विलक्षण गोलंदाजी केल्याचं सांगताना आर अश्विनने त्याची कामगिरी हिमालयाइतकी उंच असल्याचं म्हटलं आहे.
"बूमबॉल खरा शो स्टीलर होता. जसप्रीत बुमराहने विलक्षण गोलंदाजी केली. 14 विकेट्ससह तो पहिल्या क्रमांकावर असून, कसोटी क्रिकेटमध्येही प्रथम स्थानी आहे. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि ही हिमालयाइतकी मोठी कामगिरी आहे," असं आर अश्विन म्हणाला आहे.
आर अश्विनने यावेळी शुभमन गिलचंही कौतुक केलं आहे. शुभमन गिलला 12 सामन्यानंतर अखेर 50 पेक्षा अधिक धावा करण्यात यश आलं. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं. शुभमन गिलचं कौशल्य नाकारु शकत नाही, तसंच शतक ठोकत त्याने त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे असं आर अश्विन म्हणाला. तो म्हणाला की, "शुभमन गिलमध्ये किती कौशल्य आहे यात शंका नाही. पण शतक ठोकत त्याने आपण फलंदाज म्हणून किती चांगले आहोत हे सिद्ध केलं आहे”.
आर अश्विनने यावेळी हा सामना चौथ्या दिवशीही समान झाला असता पण संघाच्या असाधारण उत्साह, ऊर्जा आणि कामगिरी ने त्यांना विजय मिळवून दिला असं सांगितलं. 500 कसोटी विकेट्सपासून फक्त एक विकेट दूर असलेल्या या अनुभवी खेळाडूने या मालिकेतील उत्साहाची तुलना 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर इंग्लंडच्या ऐतिहासिक ऍशेस मालिकेशी केली, जी त्यांनी जिंकली होती.
"आम्ही चौथ्या दिवशी खेळण्यास आलो तेव्हा सामना बरोबरीत सुटेल असं वाटलं होतं. पण विलक्षण उत्साह, ऊर्जा आणि सांघिक कामगिरीमुळे आम्हाला मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवण्यास मदत झाली. इंग्लंडने 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस मालिका रोमांचक पद्धतीने खेळली होती. मी मोठ्या आवडीने ती मालिका पाहिली होती या मालिकेबद्दल मलाही अशीच उत्साहाची भावना येत आहे,” असं अश्विन म्हणाला
15 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. चेतेश्वर पुजाराचं घर असणाऱ्या राजकोटमध्ये ही सामना होणार आहे. त्यामुळे चेतेश्वर जेवण्यासाठी घरी बोलावतो का यासाठी वाट पाहावी लागेल असं अश्विन म्हणाला आहे.
"एक प्रमाणित भारतीय दिग्गज, ज्याने नुकतेच त्याचे 100 कसोटी सामने पूर्ण केले. आम्ही त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहोत. रवींद्र जडेजा, सौराष्ट्र. राजकोटचे स्टेडियम हे त्याचे घरचे मैदान आहे, पण तो जामनगरचा आहे. चेतेश्वर पुजारा आम्हाला त्याच्या घरी जेवण्यासाठी निमंत्रण देतो का ते पाहूया," असं अश्विनने सांगितलं.
2024-02-11T07:34:40Z dg43tfdfdgfd