भारतीय खेळाडूच्या एका वाक्याने जिंकली सर्वाची मनं, म्हणाला हरलो तरी चालेल पण काहीतरी...

बेनोनी : भारतीय संघ १९ वर्षांखालील वर्ल्ड कपची फायनल हरला. पण भारतीय खेळाडूच्या एका वाक्याने सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु असताना ही गोष्ट मैदानात घडली आणि सर्वांनीच भारताच्या खेळाडूचे कौतुक केले.

भारतीय संघाला विजयासाठी २५४ धावा हव्या होत्या. पण भारताचे फलंदाज एकामागून एक धारातिर्थी पडायला लागले आणि त्यांचा निश्चित पराभव होणार, असे दिसत होते. पण पराभव समोर असताना देखील भारताच्या खेळाडूचे एकच वाक्य सर्वांचे मन जिंकून गेले. भारताच्या ८ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला विजय स्पष्टपणे दिसत होता. पण त्यांना लवकर शिक्कामोर्तब करता येत नव्हते. त्यामुळेच त्यांनी बाऊन्सर्स आणि वेगवान चेंडू टाकायला सुरुवात केली. त्यावेळी मैदानात नमन तिवारी आणि अभिषेक मुरुगन होते. भारतासाठी ही जोडी महत्वाची होती. हे दोघेही गोलंदाज. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करत भारताचा पराभव थोडा दूर सारण्याचा प्रयत्न करत होते. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज त्यावेळी आग ओकत होते. त्यावेळी खेळपट्टीवर असलेला अभिषेक मुरुगन थोडासा निराश झालेला दिसत होता. त्यावेळी त्याच्या समोर असलेल्या नमन तिवारीने त्याला एकच वाक्य सांगितले. स्टम्पला असलेल्या माईकवरून ते स्पष्ट ऐकायला आले आणि त्यामुळे ते सर्वांनाच समजले. यावेळी समालोचकांनीही या वाक्याचे जोरदार कौतुक केले. कारण या बिकट क्षणी जिथे पराभव समोर दिसत होता, तिथे हे वाक्य बरंच काही शिकवणार होते. त्यावेळी नमन तिवारी हा अभिषेक मुरुगनला म्हणाला की, " गुरु, हरलो तरी चालेल, पण काहीतरी आपण शिकून जाऊया." हे नमनचे एक वाक्य त्याच्या नावाला आणि त्या परिस्थितीला शोभणारे असेलच होते. यावेळी समालोचक म्हणून मोहम्मद कैफ आणि उन्मुक्त चंद होते. या दोघांनीही यावेळी नमनच्या या वाक्याचे कौतुक केले आणि ही स्पर्धा शिकण्यासाठीच असते, असेही कैफने त्यानंतर सांगितले. त्यामुळे भारताचा पराभव झाला खरा, पण या पराभवातून हे खेळाडू नेमकं काय शिकतात, हे सर्वांसाठी महत्वाचे असेल. कारण त्यांच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे. याच स्पर्धांतून विराट कोहली, रवींद्र जडेजासारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे झाले आहेत. त्यामुळे या पराभवातून हे खेळाडू नेमकं काय शिकतात, हे सर्वांत महत्वाचे असेल.

भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. पण या संघातील खेळाडू आता भारताच्या मुख्य संघात येऊ शकतात. त्यामुळे ते या पराभावतून काय शिकले, हे सर्वांत महत्वाचे ठरणार आहे.

2024-02-11T18:02:08Z dg43tfdfdgfd