'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'

दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या कुटुंबाची जाहीर माफी मागितली आहे. एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन चाहत्यांशी संवाद साधताना अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा खुलासा केला होता. विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील (England) महत्त्वाच्या मालिकेतून ब्रेक घेतल्याने चाहते वेगवेगळे अंदाज लावत असतानाच एबी डेव्हिलिअर्सने हा खुलासा केला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या आपल्या दुसऱ्या बाळाची प्रतिक्षा करत असल्याचं त्याने सांगितलं होतं. 

विराट कोहलीने आपल्या विश्रांतीमागील कारण गुलदस्त्यात ठेवलं होतं. पण एबी डेव्हिलिअर्सने ते जाहीरपणे उघड केल्याने अनुष्का शर्मा प्रेग्नंट असण्यावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर चाहत्यांकडून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यानंतर एबी डेव्हिलिअर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन माफी मागितली असून, चाहत्यांना विराट आणि अनुष्काच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. 

Confirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला

 

"माझा मित्र विराट कोहली सध्या उपलब्ध नाही. त्याला हवी असणारी गोपनीयता द्यावी अशी मी प्रत्येकाला विनंती करत आहे. कुटुंब नेहमीच प्राथमिकता असते. नक्की काय सुरु आहे हे कोणालाच माहिती नाही. प्रत्येकाने त्याचा आदर करावा असं माझं म्हणणं आहे. मी मागच्या माझ्या कार्यक्रमात थोडा गोंधळ घातला आणि त्यासाठी मी विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागत आहे," असं एबी डेव्हिलिअर्सने म्हटलं आहे.

पुढे तो म्हणाला की, "हे योग्य नाही. मी खात्री नसणारी माहिती शेअर केली होती. तुम्ही सर्वांना विराट आणि त्याच्या कुटुंबाच्या खासगी वेळेचा आदर करावा यासाठी मी तुमच्याकडे भीक मागत आहे. आपण लवकरच विराट कोहलीला पुन्हा खेळताना, आनंदी आणि नेहमीप्रमाणे धावा करताना पाहू अशी आशा आहे".

नेमकं काय म्हणाला होता एबी डेव्हिलिअर्स?

एबी डेव्हिलिअर्स आणि विराट कोहली हे फार चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी एबी डेव्हिलिअर्सने युट्यूब चॅनेवरुन चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्याने विराट कोहली पुन्हा कधी परत येईल असं विचारलं असता त्यावर बोलताना एबी डेव्हिलिअर्सने अजाणतेने न सांगायची गोष्ट सांगून टाकली आणि क्रिकेटविश्वात चर्चा सुरु झाली.

एका चाहत्याने त्याला विराट कोहलीसंबंधी प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं होतं की, "मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत नाही. पण तो चांगला आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा असल्याने त्याने इंग्लंडविरोधातील सामन्यांमधून विश्रांती घेतली आहे. यापेक्षा जास्त माहिती मी देऊ शकत नाही पण मी त्याला पुन्हा खेळताना पाहण्याची जास्त वाट पाहू शकत नाही". 

Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'

 

यावेळी एबी डेव्हिलिअर्सने विराट कोहलीने त्याच्या मेसेजला दिलेलं उत्तर वाचून दाखवलं. "मी चांगला आहे. सध्या कुटुंबासह वेळ घालवत आहे," असं विराटने त्यात लिहिलं होतं. पुढे बोलताना त्याने विराट आणि अनुष्का दुसऱ्या बाळाची वाट पाहत असल्याचं सांगितलं. 

"जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक नसाल तर लक्ष विचलित होऊ शकतं. या पृथ्वीवर तुम्हाला सर्वात जास्त प्रिय काय आहे असं कोणी विचारलं तर कुटुंब हेच प्रत्येकाचं उत्तर असेल. त्यामुळे त्यासाठी तुम्ही एखाद्याबद्दल मत तयार करु शकत नाही," असंही तो म्हणाला.

एबी डेव्हिलिअर्सचा यु-टर्न

पण दुसऱ्याच दिवशी एबी डेव्हिलिअर्सने वक्तव्यावरुन माघार घेत आपण दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा केला. "जसं की मी माझ्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं त्याप्रमाणे हो नक्कीच कुटुंब पहिलं येतं आणि ती प्राथमिकता आहे. त्याचवेळी मी खोटी माहिती शेअर करत एक मोठी घोडचूक केली. नेमकं काय सुरु आहे हे कोणालाच माहिती नाही," असं एबी डेव्हिलिअर्सने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"मी फक्त त्याला शुभेच्छा देऊ शकतो. ब्रेकचं कारण काहीही असलं तरी विराटला फॉलो करणाऱ्या आणि त्याच्या क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या संपूर्ण जगाने त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तो आणखी मजबूत, चांगला, निरोगी आणि फ्रेश परत येईल, अशी आशा आहे,” असं एबी डेव्हिलिअर्सने सांगितलं. दरम्यान इंग्लंडविरोधातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 

2024-02-11T05:19:26Z dg43tfdfdgfd