रोहित शर्माला सतावतेय श्रेयसबरोबर या खेळाडूची चिंता, पाहा कोण ठरतोय संघासाठी डोकेदुखी

संजय घारपुरे, मुंबई : वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयपथावरुन दिमाखात वाटचाल सुरू आहे. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरच्या अपयशाची चर्चाही सुरू आहे. मात्र याचवेळी भारताचा अजून एक खेळाडू अपयशी ठरतोय आणि त्यामुळेच रोहित शर्माची चिंता वाढलेली पाहायला मिळत आहे.

वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारास शुभमन गिलला डेंगू झाला. या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंत या वर्षात सर्वाधिक १२४८ धावा शुभमन गिलच्या होत्या. भारतीय क्रिकेटचा हा नवा युवराज वर्ल्ड कप दणाणून सोडेल, शतकांची माळ लावेल, अशी अपेक्षा होती. मात्र चार सामन्यांत मिळून त्याच्या जेमतेम शंभर धावा झाल्या आहेत. त्याची सरासरी अवघी २६ आहे. तो पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकला नाही. पाकिस्तानविरुद्ध तो १६ धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने पुण्यात ५३ धावांची खेळी केली, पण त्यानंतर न्यूझीलंडने त्याला २६ धावांत टिपले, तर इंग्लंडने ९ धावाच करू दिल्या. शुभमन गिलचा हा रोहित शर्माचा सलामीचा सहकारी आहे. रोहित आक्रमण करीत आहे. त्यामुळे शुभमन गिलला सहकाऱ्याची भूमिका घ्यावी लागते, असे काही जण सांगतात. प्रत्यक्षात त्याला गोलंदाजीवर पूर्ण वर्चस्व राखता येत नाही, हेच कटू सत्य आहे.

गिल ज्या प्रकारे बाद होत आहे, ही चिंतेची बाब आहे. बांगलादेशविरुद्ध पुण्यात मोठी खेळी करण्याची त्याला संधी होती. मात्र अर्धशतकानंतर त्याने विकेट बहाल केली. न्यूझीलंडविरुद्ध आक्रमक सुरुवात केली, पण थर्ड मॅनला चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात बाद झाला. रविवारी इंग्लंडविरुद्ध जणू काही तो जास्त वेगाने धावा करण्यास उत्सुक होता. त्याचा पवित्रा पाहून त्याला जणू प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर भिरकावून द्यायचा होता. मात्र गोलंदाजांनाही साथ देणाऱ्या खेळपट्टीवर गिलला काही हे जमले नाही. वर्ल्ड कपपूर्वीचा गिल आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील गिल यात फरक दिसत आहे.

गिल का अपयशी ठरत आहे, याबाबत काही अभ्यासकांचे मत लक्षवेधक आहे. प्रामुख्याने फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूवर बॅकफूटवर खेळताना चुक करू शकतात, पण गिलच्या बाबतीत नेमके उलटे घडत आहे. फ्रंट फूटवर खेळताना त्याच्याकडून चुक होत आहे. त्यासाठी ते कारणही देतात. फलंदाज चेंडूचा टप्पा आणि उसळी लक्षात घेऊन फ्रंटफूटवर खेळायचे की बॅकफूटवर याचा निर्णय घेतात. त्यानुसार ते शरीराचे जास्त वजन पुढच्या नाहीतर मागील पायावर देतात.

गिल लहानपणी प्रामुख्याने सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर खेळला आहे. त्या ठिकाणी चेंडू जास्त उसळतो, त्यामुळे गिलला बॅकफूटवर खेळण्याचा चांगला सराव आहे. त्यामुळे तो पुल आणि हुक शॉट सहज खेळू शकतो. मात्र याचवेळी फ्रंटफूटवर खेळण्याची वेळ आली की त्याच्याकडून चुक होण्याचा जास्त धोका असतो. ताकदवान संघांनी याचा अभ्यास केला आहे आणि त्याला हीच चूक नेमकी करायला भाग पाडली जात आहे.

2023-10-31T12:22:00Z dg43tfdfdgfd